Bns 2023 कलम ३१८ : ठकवणूक :

भारतीय न्याय संहिता २०२३
ठकवणुकी (फसवणुकी) विषयी :
कलम ३१८ :
ठकवणूक :
कलम : ३१८ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ठकवणूक.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम : ३१८ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्या व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी विधित: किंवा वैध संविदेनुसार बद्ध होता त्या व्यक्तीला ठकवणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम : ३१८ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ठकवणूक किंवा अप्रामाणिकपणे मालमत्ता सुपर्द करण्यात प्रवृत्त करणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथमवर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल करुन, याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यास किंवा एखाद्या इसमाने एखादी मालमत्ता ठेवून घ्यावी या गोष्टीला संमती देण्यास कपटीपणाने किंवा अप्रमाणिकपणे प्रवृत्त करतो, अथवा याप्रमाणे दिशाभूल झालेल्या व्यक्तीची याप्रमाणे दिशाभूल झाली नसती तर तिने जी गोष्ट केली नसती, किंवा टाळली नसती आणि ज्या कृत किंवा अकृत गोष्टीमुळे कोणत्याही इसमास त्याचे स्वत:चे शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता यांच्या संबंधात नुकसान किंवा अपहानी पोचते, किंवा पोचण्याचा संभव असतो अशी कोणतीही गोष्ट करण्यास किंवा न करण्यास प्रथमोक्त व्यक्तीला उद्देशपूर्वक करतो, तो ठकवणूक करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण : अप्रामाणिक तथ्य लपवून ठेवणे, ही या कलमाच्या अर्थानुसार फसवणूक होय.
उदाहरणे :
(a) क) आपण मुलकी सेवेत असल्याचा बहाणा करुन (क) उद्देशपूर्वक (य) ची दिशाभूल करतो, आणि अशा रीतीने (य) ने त्याला उधारीवर माल घेऊ द्वावा म्हणून (य) ला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. या मालाबद्दल पैसे देण्याचा त्याचा विचार नाही. (क) ठकवणूक करतो.
(b) ख) एक वस्तू एका विवक्षित प्रख्यात निर्माणकाने तयार केली अशी (य) ची समजूत व्हावी म्हणून (क) त्या वस्तूववर नकली चिन्ह लावून (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो, आणि अशा रीतीने (य) ला ती वस्तू खरेदी करण्यास व तिचे पैसे देण्यास प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो.
(c) ग) एक वस्तू एका नमुन्याशी मिळतीजुळती आहे अशी (य) चची समजूत व्हावी म्हणून (क) त्या वस्तूचा खोटा नमुना दाखवून (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो, आणि त्याद्वारे (य) ला ती वस्तू खरेददी करण्यास व तिचे पैसे देण्यास प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो.
(d) घ) (क) एका वस्तूच्या किंमतीदाखल एका पेढीवर हुंडी करुन देतो; या पेढीकडे (क) पैसे ठेवत नाही आणि यामुळे हुंडी नाकारली जाईल अशी (क) ची अपेक्षा असल्यामुळे तो (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो आणि त्याद्वारे, त्या वस्तूबद्दल पैसे न देण्याच्या इराद्याने ती वस्तू आपल्या स्वाधीन करण्यास (य) ला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो.
(e) ङ) ज्या जिनसा हिरे नसल्याचे आपणांस माहीत आहे त्या जिनसा हिरे म्हणून तारण देऊन (क) हा (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो आणि त्याद्वारे, पैसे उसने देण्यास (य) ला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो.
(f) च) (य) हा (क) ला उसने देईल अशा कोणत्याही पैशाची परतफेड (क) करणार आहे अशी (य) ची समजूत व्हावी अशाप्रकारे (क) हा (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो आणि त्याद्वारे, पैसे उसने देण्यास (य) ला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. परतफेड करण्याचा (क) चा उद्देश नाही. (क) ठकवणूक करतो.
(g) छ) निळीची ठराविक इतकी रोपे (य) च्या स्वाधीन करण्याचा आपला इरादा नसतानाही (क) हा ती रोपे (य) च्या स्वाधीन करण्याचा आपला इरादा आहे, अशी (य) ची समजूत व्हावी अशाप्रकारे (क) हा (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो, आणि रोपे अशा रीतीने स्वाधीन करण्यात येतील या भरवशावर पैसे देण्यास तो (य) ला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो; परंतु, पैसे घेतेवेळी निळीची रोपे स्वाधीन करण्याचा (क) चा इरादा असेल आणि नंतर त्याने त्याच्या संविदेचा भंग केला व निळीची रोपे स्वाधीन केली नाहीत तर, त्याने ठकवणूक केली असे होणार नाही, मात्र संविदा-भंगाबद्दलच्या दिवाणी कारवाईसच केवळ तो पात्र असेल.
(h) ज) (क) ने (य) बरोबर केलेल्या संविदेमधील (क) चा भाग त्याने पार पाडलेला नसतानाही तो त्याने पार पाडलेला आहे अशी (य) ची समजूत व्हावी अशा प्रकारे (क) हा (य) ची उद्देशपूर्वक दिशाभूल करतो, आणि त्याद्वारे (य) ला पैसे देण्यास अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (क) ठकवणूक करतो.
(i) झ) (क) एक संपदा (ख) ला विकतो व अभिहस्तांतरित करतो. अशी विक्री केल्यामुळे त्या मालमत्तेवर आपणांला हक्क नाही हे माहीत असताना (क) हा आपण अगोदर (ख) ला केलेली विक्री व अभिहस्तांतरण यांबद्दलची वस्तुस्थिती उघड न करता ती (य) ला विकतो किंवा त्याच्याकडे गहाण ठेवतो व (य) कडून खरेदीचे किंवा गहाणावर दिलेले पैसे स्वीकारतो. (क) ठकवणूक करतो.
२) जो कोणी ठकवणूक करील त्याला, तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जर कोणी ठकवणूक केली आणि ठकवणूक ज्याच्याशी संबंधित आहे त्या संव्यवहारातील ज्या व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास तो विधित: किंवा वैध संविदेनुसार बद्ध होता त्या व्यक्तीला त्यायोगे गैरहानी पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे याची त्याला जाणीव असेल तर त्याला पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) जो कोणी ठकवणूक करील आणि त्यायोगे, एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यास अथवा एखादा मूल्यवान रोखा संपूर्णपणे किंवा त्याचा कोणताही भाग अगर जी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित आहे व मूल्यवान रोख्यात रुपांतरित करता येण्यासारखी आहे, अशी कोणतीही वस्तू बनवण्यास, तीत फेरबदल करण्यास किंवा ती नष्ट करण्यास या प्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला अप्रामणिकपणाने प्रवृत्त करील त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply