भारतीय न्याय संहिता २०२३
फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंगाविषयी (विश्वासघाताविषयी) :
कलम ३१६ :
फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग :
कलम : ३१६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या संपत्तिबाबत न्यासभंग करण्यात आला तिचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३१६ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : परिवाहक, मालधक्कावाला, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३१६ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या संपत्तिबाबत न्यासभंग करण्यात आला तिचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३१६ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाने अथवा बँक व्यवसायी, व्यापारी किंवा अभिकर्ता, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही प्रकारे स्वत:कडे मालमत्ता किंवा तिच्यावरील कसलीही हुकुमत विश्वासाने सोपवण्यात आलेली असताना, त्या मालमत्तेचा अपहार करतो, अथवा आपल्या उपयोगासाठी ती स्वत:ची म्हणून वापरतो, अथवा असा न्यास कोणत्या पध्दतीने पार पाडावा ते विहित करणारा कोणताही विधिनिदेश अगर असा न्यास पार पाडण्याच्या संबंधात त्याने स्वत: केलेली कोणतीही स्पष्ट किंवा उपलक्षित वैध संविदा यांचा भंग करून अप्रामाणिकपणे त्या मालमत्तेचा वापर करतो, किंवा तिची वासलात लावतो, किंवा बुध्दिपुरस्सर अन्य कोणत्याही व्यक्तीला तसे करू देतो तो फौजदारीपात्र (आपराधिक) न्यायभंग करतो.
स्पष्टीकरण १ :
जी व्यक्ती स्वत: एखादा नियोक्ता (नियोजक) असून, त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या भविष्यनिधीमध्ये किंवा कुटुंब वेतन निधीमध्ये जमा करण्यासाठी, कर्मचाऱ्याला प्रदेय असलेल्या वेतनामधुन कर्मचाऱ्याचे अंशदान कापून घेते त्या व्यक्तीकडे, तिने अशा रीतीने कापून घेतलेली अंशदानाची रक्कम विश्वासाने सोपवण्यात आलेली असल्याचे मानण्यात येईल आणि उक्त अधिनियमाचा भंग करुन, तिने उक्त निधीमध्ये अशा अंशदानाचा भरणा करण्यात कसूर केली, तर पूर्वोक्ताप्रमाणे विधिनिदेशाचा भंग करुन उक्त अंशदानाच्या रकमेचचा तिने अप्रामाणिकपणाने वापर केला असल्याचे मानण्यात येईल. असा नियोक्ता ते कार्यालय जरी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी अधिनियम, १९५२ (१९५२ चा १९) चे कलम १७ प्रमाणे सूट दिले असले तरी चालेल.
स्पष्टीकरण २ :
जी व्यक्ति स्वत: एखादा नियोक्ता असून, कर्मचारी राज्य विमा अधिनियम १९४८ (१९४८ चा ३४) याखाली स्थापन करण्यात आलेला जो कर्मचारी राज्य विमा निधी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने धारण केलेला असतो व त्यांच्याकडून ज्याचा कारभार पाहिला जातो त्या निधीमध्ये जमा करण्यासाठी, कर्मचाऱ्याला प्रदेय असलेल्या वेतनामधून कर्मचाऱ्याचे अंशदान कापून घेते त्या व्यक्तिकडे, तिने अशा रीतीने कापून घेतलेली अंशदानाची रक्कम विश्वासाने सोपवण्यात आलेली असल्याचे मानण्यात येईल आणि उक्त अधिनियमाचा भंग करुन तिने उक्त निधीमध्ये अशा अंशदानाचा भरणा करण्यात कसूर केली तर, पूर्वोक्ताप्रमाणे विधिनिदेशाचा भंग करुन उक्त अंशदानाच्या रकमेचा तिने अप्रामाणिकपणे वापर केला असल्याचे मानण्यात येईल.
उदाहरणे :
(a) क) (क) हा मृत व्यक्तीच्या मृत्युपत्राचा मृत्युव्यवस्थापक असून, मृत्युपत्रानुसार त्याने जायदादीची विभागणी करावी असे निर्देशित करणाऱ्या कायद्याची तो अप्रामणिकपणाने अवज्ञा करतो व आपल्या उपयोगासाठी ती स्वत:ची म्हणून वापरतो. (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केला आहे.
(b) ख) (क) हा वखारपाल आहे. (य) प्रवासाला निघालेला असून तो आपले फर्निचर, वखारीतील खोलीकरिता ठराविक रक्कम चुकती करण्यात आल्यानंतर ते परत करण्यात येईल अशा संविदेअन्वये (क) कडे विश्वासाने सोपवतो. (क) अप्रामाणिकपणाने त्या वस्तू विकतो, (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केला आहे.
(c) ग) कलकत्यात राहणारा (क) हा दिल्लीमध्ये राहणाऱ्या (य) चा अभिकर्ता आहे. (य) कडून (क) ला पाठवल्या जाणाऱ्या सर्व रकमा (य) च्या निदेशानुसार (क) ने गुंतवाव्यात असा स्पष्ट किंवा उपलक्षित करार (क) आणि (य) यांच्यामध्ये झालेला आहे. (य) हा (क) ला एक लाख रुपये (क) ने ते कंपनीच्या रोख्यामध्ये गुंतवावेत असा निदेश देऊन पाठवतो. (क) अप्रामाणिकपणाने निदेशाची अवज्ञा करतो व त्याच्या स्वत:च्या धंद्यात ते पैसे घालतो. (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केलेला आहे.
(d) घ) लगतपूर्व उदाहरणातील (क) ने जर, बँक ऑफ बेंगॉलमधील शेअर्स घेतल्याने ते (य) ला अधिक फायदेशीर ठरेल असे समजून, अप्रामाणिकपणाने नव्हे तर सद्भावपूर्वक (य) च्या निदेशांची अवज्ञा केली आणि (य) करिता कंपनीचे रोखे विकत घेण्याऐवजी बँक ऑफ बेंगॉलचे शेअर्स खरेददी केले तर त्याबाबतीत, जरी (य) ला तोटा सोसावा लागला आणि त्या तोट्याबद्दल त्याला (क) विरुद्ध दिवाणी कारवाई करण्याचा हक्क मिळाला तरीसुद्धा (क) अप्रामाणिकपणाने वागलेला नसल्यामुळे त्याने फौजदारीपात्र न्यासभंग केलेला नाही.
(e) ङ) (क) या महसूल अधिकाऱ्याकडे सरकारी पैसे विश्वासाने सोपवण्यात आलेले आहे व त्याच्याकडे असेल तो सर्व सरकारी पैसा त्याने विवक्षित कोषागारात भरावास असा त्याला कायद्याद्वारे निदेश देण्यात आलेला आहे अथवा शासनाशी झालेल्या स्पष्ट किंवा उपलक्षित संविदेअन्वये तेसे करण्यास तो बांधलेला आहे. (क) अप्रामाणिकपणाने तो पैसा स्वत:चा म्हणून वापरतो. (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केलेला आहे.
(f) च) खुष्कीमार्गे किंवा जलमार्गे न्यावयाची मालमत्ता (क) या परिवाहकाकडे (य) ने विश्वासाने सोपवली आहे. (क) अप्रामाणिकपणाने त्या मालमत्तेचा अपहार करतो. (क) ने फौजदारीपात्र न्यासभंग केलेला आहे.
२) जो कोणी फौजदारीपात्र न्यासभंग करील त्याला, पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) परिवाहक मालधक्कावाला किंवा वखारपाल म्हणून स्वत:कडे मालमत्ता विश्वासाने सोपविण्यात आलेली असताना, जो कोणी अशा मालमत्तेच्या संबंधात फौजदारीपात्र न्यासभंग करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) स्वत: कारकून किंवा चाकर असून, अथवा कारकून किंवा चाकर या नात्याने नोकरी करत असून आणि अशा न्यायाने स्वत:कडे मालमत्ता किंवा मालमत्तेवरील कसलीही हुकमत कोणत्याही रीतीने सोपविण्यात आली असताना जो कोणी त्या मालमत्तेच्या बाबतीत फौजदारीपात्र न्यासभंग करीत त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
५) लोकसेवक या नात्याने अथवा बँक व्यवसायी, व्यापारी, अडत्या, दलाल, मुखत्यार किंवा अभिकर्ता म्हणून आपल्या धंद्याच्या ओघात स्वत:कडे एखादी मालमत्ता किंवा मालमत्तेवरील कसलीही हुकमत कोणत्याही रीतीने सोपवण्यात आली असताना, जो कोणी त्या मालमत्तेच्या बाबतीत फौजदारीपात्र न्यासभंग करील त्याला, आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.