भारतीय न्याय संहिता २०२३
जबरी चोरी व दरोडा विषयी :
कलम ३०९ :
जबरी चोरी :
कलम : ३०९ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जबरी चोरी
शिक्षा : १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : जबरी चोरी जर राजमार्गावर (हमरस्त्यावर) सुर्यास्त व सुर्योदय यांच्या दरम्यान झाली तर.
शिक्षा : १४ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कलम : ३०९ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जबरी चोरी करण्याचा प्रयत्न
शिक्षा : ७ वर्षाचा कठिन कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कलम : ३०९ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कठिन कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) सर्व प्रकारच्या जबरी चोरीमध्ये एकतर चोरी किंवा बलाद्ग्रहण यांचा समावेश होतो.
२) जर, चोरी करण्यासाठी अथवा चोरी करताना अथवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता पळवून नेताना किंवा नेण्याच्या प्रयत्नात असताना अपराध्याने त्या उद्दिष्टांकरिता इच्छापूर्वक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, मृत्यू किंवा दुखापत किंवा गैर निरोध घडवून आणला किंवा तसे घडवून आणण्याचा प्रयत्न केला अथवा तात्काळ मृत्यूची किंवा तात्काळ दुखापतीची किंवा तात्काळ गैर निरोधाची भीती निर्माण केली, किंवा तसे करण्याचा प्रयत्न केला तर, चोरी ही जबरी चोरी ठरते.
३) बलाद्ग्रहण करण्याच्या वेळी जर अपराधी ज्या व्यक्तीला भीती घालण्यात आली असेल त्या व्यक्तीच्या समक्ष उपस्थित असून त्या व्यक्तीला त्याने त्या व्यक्तीच्या किंवा अन्य एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, तात्काळ मृत्यू किंवा तात्काळ दुखापत किंवा तात्काळ गैर निरोध यांची भीती घालून बलाद्ग्रहण केले आणि अशी भीती घालून त्याने बलाद्ग्रहण करावयाची वस्तू तेथल्या तेथे स्वाधीन करण्यास त्या भीती घातलेल्या व्यक्तीला प्रवृत्त केले तर, ते बलाद्ग्रहण ही जबरी चोरी ठरते.
स्पष्टीकरण :
अपराधी जर, त्या अन्य व्यक्तीला तात्काळ मृत्यू किंवा तात्काळ दुखापत किंवा तात्काळ गैर निरोध यांची भीती घालू शकण्याइतपत जवळपास असेल, तर तो समक्ष उपस्थित आहे असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) ला खाली पाडून धरतो, व (य) च्या संमतीवाचून कपटीपणाने (य) च्या अंगरख्यामधून (य) चे पैसे व रत्ने काढून घेतो. या बाबतीत, (क) ने चोरी केली आहे आणि ती चोरी करता यावी यासाठी त्याने इच्छापूर्वक (य) ला गैरपणे निरुद्ध केले आहे. त्याअर्थी, (क) ने जबरी चोरी केली आहे.
(b) ख) (क) हा (य) ला भर रस्त्यावर गाठतो, पिस्तूल दाखवतो, आणि (य) ची पैशांची थैली मागतो. परिणामी, (य) आपली थैली स्वाधीन करतो. याबाबतीत, (क) ने (य) ला तात्काळ दुखापतीची भीती घालून (य) कडून ती थैली जबरीचे घेतली आहे, व बलाद्ग्रहण करण्याच्या वेळी तो (य) च्या समक्ष उपस्थित आहे. त्याअर्थी, (क) ने जबरी चोरी केली आहे.
(c) ग) (क) हा (य) ला व (य) च्या मुलाला भर रस्त्यावर गाठतो. (क) त्या मुलाला हिसकावून घेतो, आणि (य) ने आपली पैशाची थैली स्वाधीन केली नाही तर आपण त्या मुलाला कड्यावरुन खाली फेकून देऊ अशी धमकी देतो. परिणामी, (य) आपली थैली स्वाधधीन करतो. या बाबतीत, तेथे समक्ष उपस्थित असलेल्या मुलाला तात्काळ दुखापत केली जाईल अशी (य) ला भीती घालून, (क) ने (य) कडून पैशाची थैली जबरीने घेतली आहे. त्याअर्थी, (क) ने (य) ची जबरी चोरी केली आहे.
(d) घ) तुझे मूल माझ्या टोळीच्या हाती आहे, व तू आमच्याकडे दहा हजार रुपये पाठवले नाहीस तर, त्याचा मृत्यू घडवून आणण्यात येईल. असे म्हणून (क) हा (य) कडून मालमत्ता मिळवतो. हे बलाद्ग्रहण आहे, व बलाद्ग्रहण म्हणून शिक्षापात्र आहे. पण (य) ला (य) च्या मुलाला तात्काळ मृत्यु घडवून आणण्याची भीती घातलेली नसेल तर, ती जबरी चोरी नव्हे.
४) जो कोणी जबरी चोरी करील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर जबरी चोरी ही हमरस्त्यावर सूर्यास्त व सूर्योदय यांच्या दरम्यान करण्यात आली, तर कारावासाची मुदत चौदा वर्षेपर्यंत वाढविता येईल.
५) जो कोणी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करील, त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
६) जर कोणत्याही व्यक्तीने जबरी चोरी करताना किंवा करण्याच्या प्रयत्नात असताना इच्छापूर्वक दुखापत केली तर अशी व्यक्ती किंवा अशी जबरी चोरी करण्याच्या कामी किंवा जबरी चोरी करण्याच्या प्रयत्नात तिच्या जोडीने निबध्द असलेली अन्य कोणतीही व्यक्ती यांना आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व त्या द्रव्यदंडासही पात्र होतील.