भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६ :
मृत्यू घडवून आणण्याचा उद्देश नसताना, व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती :
जिच्यामुळे मृत्यू घडून यावा असा उद्देश नाही अशी जी गोष्ट (कृती) एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी सद्भावपूर्वक करण्यात आली असून तिच्यामुळे घडणारा कोणताही अपाय सोसण्यास किंवा त्या अपायाचा धोका पत्करण्यास तिने स्पष्टपणे अगर गर्भित संमती दिली असेल तर, अशा कोणत्याही व्यक्तीला तो अपाय झाला किंवा तो व्हावा असे कर्त्याला उद्देशित होते किंवा तो होण्याचा संभव असल्याची जाणीव होती, या कारणाने अशी कोणतीही गोष्ट (कृती) अपराध होत नाही.
उदाहरण :
एका वेदनापूर्ण विकाराने पीडित असलेल्या (य) चा विशिष्ट शस्त्रक्रियेमुळे मृत्यु घडून येणे संभवनीय आहे अशी जाणीव असताना, पण (य) चा मृत्यु घडवून आणण्याचा उद्देश नसताना आणि (य) च्या हिताचा उद्देश सद्भावपूर्वक बाळगून (क) शल्यचिकित्सक (य) च्या संमतीने त्याच्यावर ती शस्त्रक्रिया करतो. (क) ने काहीही अपराध केलेला नाही.