भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २६२ :
एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर गिरफदारीला (अटकेला) प्रतिकार किंवा अटकाव करणे:
कलम : २६२
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर गिरफदारीला प्रतिकार किंवा अटकाव करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी स्वत:वर ज्या अपराधाचा दोषारोप आहे किंवा ज्याबद्दल स्वत: सिद्धदोष ठरला (शिक्षा झालेली) आहे अशा कोणत्याही अपराधाबद्दल आपली कायदेशीर गिरफदारी (अटक) होण्यास उद्देशपूर्वक कोणत्याही प्रकारे प्रतिकार करील, किंवा अवैध (बेकायदेशीरपणे) अटकाव करील, अथवा अशा एखाद्या अपराधाबद्दल आपणास कायदेशीरपणे जेथे स्थानबध्द करण्यात आले आहे अशा कोणत्याही हवालतीमधून पळून जाईल, किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
या कलमातील शिक्षा ही गिरफदार (अटक) करावयाची, किंवा हवालतीत स्थानबध्द केलेली व्यक्ती ज्या अपराधाचा तिच्यावर दोषारोप होता किंवा ज्याबद्दल ती सिद्धदोष ठरली (शिक्षा झाली होती) त्या अपराधाबद्दल ज्या शिक्षेला पात्र असेल तिच्या व्यतिरिक्त (शिक्षेखेरीज) नेमलेली आहे (जादा असेल).