भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २५ :
जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती :
जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून येणे संभवनीय असल्याची कर्त्याला जाणीव नाही, अशी कोणतीही गोष्ट (कृती), तिच्यामुळे होणारा कोणताही अपाय सोसण्यास जिने व्यक्त किंवा उपलक्षित संमती दिली आहे अशा अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला तो अपाय झाला किंवा तो व्हावा असे कर्त्याला उद्देशित होते या कारणाने, अथवा तिच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही अपायाचा धोका पत्करण्यास अशा ज्या कोणत्याही व्यक्तीने संमती दिली आहे तिला त्या गोष्टीमुळे तो अपाय होणे संभवनीय असल्याची कर्त्याला जाणीव होती या कारणाने अपराध होत नाही.
उदाहरण :
(क) व (य) हे करमणुकीखातर एकमेकांबरोबर शस्त्रक्रीडा करण्याचे ठरवतात. याप्रमाणे शस्त्रक्रीडा करण्याच्या ओघात गैर डाव नसताना जो कोणताही अपाय होईल तो सोसण्यास प्रत्येकाची संमती असल्याचे या ठरावात उपलक्षित आहे, आणि न्याय्यपणे खेळत असताना, (क) कडून (य) ला दुखापत झाली तर (क) चा काहीही अपराध होत नाही.