भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२९ :
खोटा पुराव्याबद्दल शिक्षा :
कलम : २२९ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : न्यायिक कार्यवाहीत खोटा पुरावा देणे किंवा रचणे.
शिक्षा : ७ वर्षाचा कारावास व १०००० रुपए द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : २२९ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अन्य कोणत्याही प्रकरणी खोटा पुरावा देणे किंवा रचणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व ५००० रुपए द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र .
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जो कोणी न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्याच्या वेळी उद्देशपूर्वक खोटा पुरावा देईल किंवा न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्याच्या वेळी वापरला जावा यासाठी खोटा पुरावा रचेल तो, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) जो कोणी पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबतीत उद्देशपूर्वक खोटा पुरावा देईल अगर रचेल त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाया कारावासाची शिक्षा होईल आणि तो पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण १:
लष्करी न्यायालयापुढील संपरीक्षा (खटला चालणे) ही न्यायिक कार्यवाही होय.
स्पष्टीकरण २:
न्यायालयीन कार्यवाहीपूर्वी करावयाचे म्हणून विधित: (कायद्याने) विहित (मान्य) केलेले अन्वेषण (पोलीस तपास कार्यवाही) हे जरी न्यायालयच्या पुढे होत नसले तरीही, तो न्यायिक कार्यवाहीतील टप्पा होय.
उदाहरण :
(य) यास संपरीक्षार्थ सुपूर्द करण्यात यावे किंवा कसे हे विनिश्चित करण्यासाठी दंडाधिकाऱ्यासमोर चाललेला चौकशीमुळे (क) कथन खोटे असल्याचे आपणांस माहीत आहे ते शपथपूर्वक करतो. ही चौकशी न्यायिक कार्यवाहीतील टप्पा असल्यामुळे (क) ने खोटा पुरावा दिला असे दिसते.
स्पष्टीकरण ३:
जे अन्वेषण (पोलिस तपास) करण्याविषयी न्यायालयाने कायद्यानुसार आदेश दिलेला असून, न्यायालयाच्या प्राधिकारान्वये (अधिकारानुसार) चालवले जाईल ते जरी न्यायालयापुढे होत नसले तरीही, तो न्यायिक कार्यवाहीतील टप्पा होय.
उदाहरण :
जमिनीच्या सीमारेषा जागच्या जागी विनिश्चित करण्यासाठी न्यायालयाने प्रतिनियुक्त केलेल्या अधिकाऱ्यापुढील चौकशीमध्ये (क) जे कथन खोटे असल्याचे आपणांस माहीत आहे ते शपथपूर्वक करतो. ही चौकशी न्यायिक कार्यवाहीतील टप्पा असल्यामुळे (क) ने खोटा पुरावा दिला असे हाते.