भारतीय न्याय संहिता २०२३
गैरनिरोध व परिरोध यांविषयी :
कलम १२६ :
गैरनिरोध :
कलम : १२६ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करणे.
शिक्षा : १ महिन्यांचा साधा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : निरुद्ध किंवा परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) कोणत्याही व्यक्तीस ज्या दिशेने जाण्याचा हक्क असेल अशा कोणत्याही दिशेने जाण्यास तिला जो कोणी इच्छापूर्वक अटकाव करतो त्या व्यक्तीस गैरपणे निरुद्ध करतो असे म्हटले जाते.
अपवाद :
जमीन किंवा पाणी यावरील ज्या खाजगी भागात (मार्गात) असा अटकाव करण्याचा आपणास कायदेशीर हक्क आहे असे एखादी व्यक्ती सद्भावपूर्वक समजत असेल त्या मार्गामध्ये असा अटकाव करणे हा या कलमाच्या अर्थानुसार अपराध नाही.
उदाहरण :
(य) ला ज्या मार्गावरुन जाण्याचा हक्क आहे तो मार्ग बंद करण्याचा आपणांस हक्क आहे असे (क) सद्भावपूर्वक समजत नसताना तो मार्ग अडवतो. त्यामुळे (य) ला त्या मार्गाने जाण्यास प्रतिबंध होतो. (क) हा (य) ला गैरपणे निरुद्ध करतो.
२) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे निरुद्ध करील त्याला, एक महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.