भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११८ :
घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोचवणे :
कलम : ११८ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास किंवा २०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ११८ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे.
शिक्षा : आजीवन कारावास किवा १ वर्षापेक्षा कमी नाही परंतु १० वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) कलम १२२ च्या पोटकलम (१) मध्ये उपबंधित (तरतूद) केलेली बाब खेरीजकरुन एरवी, गोळी घालण्याचे, भोसकण्याचे किंवा कापण्याचे कोणतेही साधन किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता जे मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे तसे कोणतेही साधन याच्या साहाय्याने अथवा आग किंवा कोणताही तप्त पदार्थ याच्या साहाय्याने अथवा कोणतेही विष किंवा कोणताही दाहक पदार्थ याच्या साहाय्याने अथवा जो पदार्थ श्वासाबरोबर आत जाणे, गिळला जाणे किंवा रक्तात पोचणे हे मानवी शरीराला अपायकारक आहे अशा कोणत्याही पदार्थाच्या साहाय्याने अथवा कोणत्याही प्राण्याच्या साहाय्याने जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवील त्याला, तीन वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा विस हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किवा दोन्ही शिक्षा होतील.
२) कलम १२२ च्या पोटकलम (२) मध्ये उपबंधित (तरतूद) केलेली बाब खेरीजकरुन एरवी, पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट कोणत्याही साधनाद्वारे इच्छापूर्वक जबर दुखापत पोचविल त्याला आजीवन कारावास किंवा एक वर्षापेक्षा कमी नाही परंतु दहा वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.