भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१९ :
तोतयेगिरी करुन ठकवणूक :
कलम : ३१९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : तोतयेगिरी करुन ठकवणूक करणे.
शिक्षा : ५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जर एखाद्या व्यक्तीने आपण दुसराच एखादा इसम असल्याचा बहाणा करुन, अथवा जाणीवपूर्वक एखाद्या इसमाऐवजी दुसरा इसम म्हणजे आपण स्वत: किंवा अशी अन्य व्यक्ती होय असे अभिवेदन करुन ठकवणूक केली तर, ती व्यक्ती तोतयेगिरी करुन ठकवणूक करते असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण:ज्या इसमाचा बहाणा करुन तोतयेगिरी केली गेली तो इसम ही खरीखुरी व्यक्ती असली वा कल्पित व्यक्ती असली तरी अपराध घडतो.
उदाहरणे :
(a) क) (क) हा, त्याच्याच नावाचा विवक्षित श्रीमंत सावकार म्हणजे आपणच असल्याचा बहाणा करुन ठकवणूक करतो. (क) हा तोतयेगिरी करुन ठकवणूक करतो.
(b) ख) (क) हा, आपण म्हणजे (ख) ही व्यक्ती असल्याचा बहाणा करुन ठकवणूक करतो. ती व्यक्ती मृत आहे. (क) हा तोतयेगिरी करुन ठकवणूक करतो.
२) जो कोणी तोतयेगिरी करुन ठकवणूक करील त्याला, पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.