भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२४ :
ॲसिड इत्यादीचा वापर करुन इच्छापूर्वक जबर दुखापत करणे :
कलम : १२४ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ॲसिड इत्यादीचा वापर करुन स्वेच्छेने गंभीर (जबर) दुखापत करणे.
शिक्षा : किमान १० वर्षे किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड पीडीत व्यक्तीच्या उपचारांसाठी देणे
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : १२४ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : किमान ५ वर्षे किंवा कमाल ७ वर्षे कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी, एखाद्या व्यक्तीवर ॲसिड फेकून किंवा तिला ॲसिड देऊन किंवा तिला इजा किंवा क्षती (दुखापत) करण्याच्या उद्देशाने किंवा अशी इजा किंवा दुखापत होईल हे माहीत असताना त्या व्यक्तीला कायमस्वरुपी किंवा आंशिक हानी पोहोचवील किंवा व्यंग निर्माण करील किंवा विद्रूप करील किंवा तिला अपंग करील किंवा जबर इजा पोहोजवील त्याला, दहा वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत इतक्या मुदतीची असू शकेल अशी कोणत्यातरी दोन्ही पैकी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल :
परंतु असे की, असा द्रव्यदंड हा, पीडित व्यक्तीच्या उपचारांचा वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी पुरेसा आणि वाजवी असेल.
परंतु आणखी असे की, या कलमान्वये आकारलेला द्रव्यदंड पीडित व्यक्तीला देण्यात येईल.
२) जो कोणी, एखाद्या व्यक्तीला कायमस्वरुपी किंवा आंशिक हानी पोहोचविण्याच्या, व्यंग निर्माण करण्याच्या किंवा भाजण्याच्या किंवा पंगू करण्याच्या किंवा त्या व्यक्तीला विद्रूप करण्याच्या, अपंग करण्याच्या किंवा जबर हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीवर ?सिड फेकील किंवा फेकण्याचा प्रयत्न करील किंवा एखाद्या व्यक्तीला ?सिड देईल किंवा अन्य कोणत्याही साधनाचा वापर करील त्याला, पाच वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तसेच तो दंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण १ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी ॲसिड (आम्ल) या शब्दात, जे आम्लधर्मी किंवा क्षारक स्वरुपाचे आहेत व त्यामुळे शारीरिक इजा, व्रण किंवा विद्रूपता किंवा तात्पुरते किंवा कायम स्वरुपी अपंगत्व निर्माण करण्यास सक्षम आहेत अशा पदार्थांचा समावेश होतो.
स्पष्टीकरण २ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, कायमस्वरुपी किंवा आंशिक हानी किंवा पंगुत्व हे पुन्हा मूळ स्वरुप प्राप्त न होणारेच असले पाहिजे असे नाही.