भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ११७ :
इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे :
कलम : ११७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ११७ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर परिणामस्वरुप कायमचे अपंगत्व येते किंवा त्या व्यक्तीला कायमस्वरुपी अशक्तपणा येतो.
शिक्षा : कठोर कारावास, जो १० वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासपर्यंत होऊ शकेल, ज्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ११७ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या गटाद्वारे जबर दुखापत पोहचविणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
१) जो कोणी इच्छापूर्वक दुखापत पोचवता त्याचा जी दुखापत करण्याचा उद्देश आहे किंवा जी दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे ती जर जबर दुखापत असे आणि तो ज्या दुखापतीस कारण होतो ती जबर दुखापत असेल तर, तो इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
ज्या बाबतीत एखादा इसम जबर दुखापत पोचण्यास कारण झाला आहे आणि जबर दुखापत पोचवण्याचा त्याचा उद्देशही आहे किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे, याची त्याला जाणीवही आहे या दोन्ही गोष्टी असतील तेवढे खेरीजकरुन एरवी, तो इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवतो असे म्हटले जात नाही. पण जर एका प्रकारची जबर दुखापत करण्याचा स्वत:चा उद्देश असताना किंवा तशी दुखापत होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना प्रत्यक्षात त्याच्या हातून दुसऱ्या प्रकारची जबर दुखापत झाली असेल तर, तो इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवतो असे म्हटले जाते.
उदाहरण :
(य) चा चेहरा कायमचा विद्रुप करण्याच्या उद्देशाने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना (क) हा (य) ला ठोसा मारतो, त्यामुळे (य) चा चेहरा कायमचा विद्रुप होत नाही, पण त्याला वीस दिवस इतका काळ दु:सह शारीरिक वेदना सहन करव्या लागतात. (क) ने इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवली आहे.
२) कलम १२२ च्या पोटकलम (२) मध्ये उपबंधित केलेली बाब खेरीज करुन एरवी, जो कोणी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवील त्याला, सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची ही शिक्षा होईल.
३) जो कोणी पोटकलम (१) अन्वये अपराध करतो आणि ते करत असताना कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहोचवतो ज्यामुळे त्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व येते किंवा त्या व्यक्तीला कायमस्वरुपी अशक्तपणा येतो, त्याला दहा वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी म्हणजे, त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित भागासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
४) कोणत्याही व्यक्तीला तिची जात, जात, लिंग, जन्मस्थान, भाषा, वैयक्तिक श्रद्धा किंवा पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या गटाद्वारे, सामान्यपणे कृति करताना, इतर समरुप कोणत्याही कारणामुळे जबर दुखापत झाल्यास, अशा गटातील प्रत्येक सदस्य जबर दुखापत करण्याचा गुन्हयात दोषी असेल आणि सात वर्षांपर्यंत वाढविता येइल इतक्या मुदतीच्या दोन्ही पैकी कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षेस पात्र ठरेल आणि द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र ठरेल.