Arms act कलम १८ : अपिले :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम १८ :
अपिले :
१) लायसन प्राधिकरणाने दिलेला, लायसन मंजूर करण्याचे नाकारणारा किंवा लायसनच्या शर्तीमध्ये बदल करणारा आदेश अथवा लायसन प्राधिकरणाने किंवा लायसन प्राधिकरण ज्यास दुय्यम आहे अशा प्राधिकरणाने दिलेला, लायसनाचे निलंबन किंवा प्रत्याहरण करणारा आदेश यामुळे नाराज झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, विहित करण्यात येईल अशा प्राधिकरणाकडे (ज्याचा हात यापुढे अपील प्राधिकरण म्हणून उल्लेख करण्यांत आला आहे) व तशा विहित कालावधित त्या आदेशाविरूद्ध अपील करता येईल :
परंतु शासनाने किंवा त्याच्या निदेशाखाली दिलेल्या कोणत्याही आदेशाविरूद्ध कोणतेही अपील होऊ शकणार नाही.
२) अपील दाखल करण्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतर ते दाखल करण्यात आल्यास ते दाखल करून घेतले जाणार नाही :
परंतु सदर कालावधित अपील दाखल न करण्याला आपणास पुरेसे कारण होते याविषयी अपीलकत्र्याने अपील प्राधिकरणाची खात्री करून दिली तर, विहित केलेला कालावधी संपल्यानंतरही अपील दाखल करून घेता येईल.
३) अपिलाकरिता विहित केलेला कालावधी १.(भारतीय मुदत अधिनियम, १९०८ (१९०८ चा ९) ) याखालील मुदतींची संगणना करण्याबाबत त्यामध्ये असलेल्या उपबंधानुसार संगणित केला जाईल.
४) या कलमाखालील प्रत्येक अपील लेखी विनंती-अर्जाद्वारे करण्यात येईल आणि ज्याविरूद्ध अपील करण्यात आले आहे अशा आदेशामागील कारणांचे संक्षिप्त निवेदन अपीलकत्र्यास पुरवण्यात आले असल्यास असे निवेदन आणि विहित करण्यात येईल अशी फी त्या अर्जासोबत असेल.
५) अपिलाचा निकाल करतांना, अपील प्राधिकरण विहित करण्यात येईल अशी प्रक्रिया अनुसरील :
परंतु, अपीलकत्र्यास आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देण्यात आल्याशिवाय, कोणत्याही अपिलाचा निकाल करण्यात येणार नाही.
६) ज्याविरूद्ध अपील करण्यात आले असेल असा आदेश, अपील प्राधिकरणाने अन्यथा सशर्त किंवा बिनशर्त निदेश दिला नसेल तर, अशा आदेशाविरूद्ध झालेल्या अपिलाचा निकाल होईपर्यंत अंमलात राहील.
७) ज्याविरूद्ध अपील करण्यात आले असेल असा आदेश कायम करणारा, त्यात अपरिवर्तन करणारा किंवा तो फिरवणारा अपील प्राधिकरणाचा प्रत्येक आदेश अंतिम असेल.
———
१. आता पहा मुदत अधिनियम १९६३ (१९६३ चा ३६).

Leave a Reply