शस्त्र अधिनियम १९५९
कलम १४ :
लायसन नाकारणे :
१) कलम १३ मध्ये काहीही असले तरी, लायसन प्राधिकरण पुढील बाबतीत लायसने मंजूर करण्यास नकार देईल :-
(a)क)(अ) कलम ३, कलम ४ किंवा कलम ५ या खालील लायसन कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारूगोळा यांच्याबाबत मागितले गेले असेल तेव्हा ते लायसन ;
(b)ख)(ब) दुसऱ्या प्रकरणाखालील अन्य कोणत्याही बाबतीतील लायसन,
एक) जी व्यक्ती,-
१) कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा संपादन करण्यास, ती आपल्या कब्जात ठेवण्यास किवा बरोबर बाळगण्यास या अधिनियमाद्वारे किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे मनाई केलेली आहे, किंवा
२) विकल मनाची आहे, किंवा
३) या अधिनियमानुसार लायसन मिळण्यसा कोणत्याही कारणामुळे अयोग्य आहे, असे समजण्यास लायसन प्राधिकरणाला कारण आहे अशा व्यक्तीने मागितले असेल तेव्हा; किंवा
दोन) सार्वजनिक शांतता राखण्याच्या किंवा सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने असे लायसन मंजूर करण्यास नकार देणे आवश्यक आहे असे लायसन प्राधिकरणाला वाटत असेल तेव्हा, ते लायसन.
२) लायसन प्राधिकरण, एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किंवा तिच्या कब्जात पुरेशी मालमत्ता नाही एवढ्याच केवळ कारणावरून अशा कोणत्याही व्यक्तीला एखादे लायसन मंजूर करावयाचे नाकारणार नाही.
३) एखाद्या व्यक्तीस लायसन मंजूर करण्यास लायसन प्राधिकरण नकार देईल त्याबाबतीत, ते अशा नकाराची कारणे लेखी नमूद करील आणि त्या व्यक्तीला त्यांचे संक्षिप्त निवेदन पुरवणे लोकहिताचे ठरणार नाही असे ज्या बाबतीत त्याचे मत असेल अशी एखादी बाब सोडून एरव्ही तो मागणी झाल्यास तिला असे निवेदन पुरवील.
