Bnss कलम ३३७ : एकदा सिध्ददोष किंवा दोषमुक्त ठरविण्यात आलेल्या व्यक्तीची त्याच अपराधाबद्दल संपरीक्षा करावयाची नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २६ :
चौकशी व संपरीक्षा या संबंधीचे सर्वसाधारण उपबंध (तरतुदी) :
कलम ३३७ :
एकदा सिध्ददोष किंवा दोषमुक्त ठरविण्यात आलेल्या व्यक्तीची त्याच अपराधाबद्दल संपरीक्षा करावयाची नाही :
१) ज्या व्यक्तीची एखाद्या अपराधाबद्दल पुरेशा अधिकारितेच्या न्यायालयाने एकदा संपरीक्षा केली असून, अशा अपराधाबाबत तिला सिध्ददोष किंवा दोषमुक्त ठरवले असेल ती व्यक्ती अशी दोषसिध्दी किंवा दोषमुक्ती अमलात असताना त्याच अपराधाबद्दल अथवा त्याच तथ्यांवरून, तिच्याविरूध्द ठेवण्यात आलेल्या दोषारोपाहून अन्य असा दोषरोप कलम २४४ च्या पोटकलम (१) खाली ज्या अपराधाबद्दल ठेवता आला असता किंवा त्या कलमाच्या पोटकलम (२) खाली ज्याबद्दल तिला सिध्ददोष ठरवता आले असते अशा अन्य कोणत्याही अपराधाबद्दल पुन्हा संपरीक्षा केली जाण्यास पात्र असणार नाही.
२) कोणत्याही अपराधाबाबत दोषमुक्त किंवा सिध्ददोष ठरलेल्या व्यक्तीची, कलम २४३ च्या पोटकलम (१) खाली पूर्वीच्या संपरीक्षेत ज्यबद्दल तिच्याविरूध्द अलग दोषारोप ठेवता आला असता अशा कोणत्याही विभिन्न अपराधाबद्दल राज्य शासनाच्या संमतीने मागाहून संपरीक्षा करता येईल.
३) कोणत्याही कृतीने घडलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सिध्ददोष ठरवण्यात आले असून, त्या कृतीमुळे घडून आलेले परिणाम व अशी कृती मिळून, तिला ज्याबद्दल सिध्ददोष ठरविण्यात आले त्याहून वेगळा असा अपराध घडला असेल त्या बाबतीत, तिला सिध्ददोष ठरवण्यात आले त्या वेळी ते परिणाम घडलेले नसतील तर, किंवा ते घडले असल्याचे न्यायालयात माहीत नसेल तर, अशा लगतपूर्वी उल्लेखिलेल्या अपराधाबद्दल तिची मागाहून संपरीक्षा करता येईल.
४) कोणत्याही कृती मिळून घडलेल्या कोणत्याही अपराधाबाबत दोषमुक्त किंवा सिध्ददोेष ठरलेल्या व्यक्तीवर, अशी दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी झाली असली तरीही, तिने केलेल्या त्याच कृती मिळून घडलेल्या अन्य कोणत्याही अपराधाबद्दल मागाहून दोषारोप ठेवावयाचा असल्यास, प्रथम ज्या न्यायालयाने तिची संपरीक्षा केली असेल ते न्यायालय त्या अपराधाची संपरीक्षा करण्यास सक्षम नव्हते असे असेल तर, अशा अन्य अपराधाबद्दल तिच्यावर मागाहून दोषारोप ठेवून तिची संपरीक्षा करता येईल.
५) कलम २८१ खाली विनादोषारोप सोडून देण्यात आलेल्या व्यक्तीला ज्या न्यायालयाने याप्रमाणे विनादोषरोप सोडून दिले असेल त्या न्यायालयाच्या किंवा ज्या अन्य कोणत्याही न्यायालयाला असे प्रथम उल्लेखिलेले न्यायालय दुय्यम असेल त्या न्यायालयाच्या संमतीखेरीज, त्याच अपराधाबद्दल तिची पुन्हा संपरीक्षा केली जाणार नाही.
६) या कलमातील कोणतीही गोष्ट सर्वसाधारण वाक्खंड अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) यामधील कलम २६ च्या किंवा या संहितेतील कलम २०८ च्या उपबंधांवर परीणाम करणार नाही.
स्पष्टीकरण :
फिर्याद काढून टाकणे किंवा आरोपीला विनादोषारोप सोडून देणे म्हणजे, या कलमाच्या प्रयोजनार्थ, दोषमुक्ती नव्हे.
उदाहरणे :
(a) क) नोकरीत असताना चोरी केल्याच्या दोषारोपावरुन (क) ची संपरीक्षा केलेली असून, त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. दोषमुक्ती अंमलात असताना मागाहून त्याच्यावर, नोकरीत असताना चोरी केल्याचा किंवा त्याच तथ्यांवरुन नुसत्या चोरीचा किंवा फौजदारीपात्र न्यासभंगाचा दोषारोप ठेवता येणार नाही.
(b) ख) जबर दुखापत केल्याबद्दल (क) ची संपरीक्षा केलेली असून, त्याला सिद्धदोष ठरवण्यात आले आहे. नंतर जखमी व्यक्ती मरण पावते. सदोष मनुष्यवधाबद्दल (क) ची पुन्हा संपरीक्षा करता येईल.
(c) ग) (क) वर (ख) ची हत्या केल्याबद्दल सदोष मनुष्यवधाचा दोषारोप सत्र न्यायालयापुढे ठेवण्यात येऊन त्याला सिद्धदोष ठरवण्यात आले आहे. त्याच तथ्यांवरुन (क) ची (ख) च्या खुनाबद्दल संपरीक्षा करता येणार नाही.
(d) घ) (ख) ला स्वेच्छापूर्वक दुखापत केल्याबद्दल (क) वर प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवले आहे. ही बाब या कलमाच्या पोटकलम (३) खाली येत नसल्यास, (ख) ला जबर दुखापत केल्याबद्दल मागाहून त्याच तथ्थ्यांवरुन (क) ची संपरीक्षा करता येणार नाही.
(e) ङ) (ख) च्या अंगावरील संपत्तीची चोरी केल्याबद्दल द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याने (क) वर दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवले आहे. त्याच तथ्थ्यावरुन मागाहून (क) वर जबरी चोरीचा दोषारोप ठेवून त्याची संपरीक्षा करता येईल.
(f) च) (घ) ची जबरी चारी केल्याबद्दल प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याने (क), (ख) व (ग) यांच्यावर दोषारोप ठेवून त्यांना सिद्धदोष ठरवले आहे. त्याच तथ्यांवरुन मागाहून (क), (ख) व (ग) यांच्यावर दरवड्याचा दोषारोप ठेवून त्यांची संपरीक्षा करता येईल.

Leave a Reply