भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४५ :
शाबीत केलेल्या अपराधात जेव्हा दोषारोप केलेला अपराधात समाविष्ट असतो तेव्हा :
१) ज्या अनेक बाबींपैकी काहींच्याच संयोगामुळे एखादा पूर्ण गौण अपराध होतो त्या बाबी मिळून बनलेल्या अपराधाचा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दोषारोप ठेवलेला असेल. आणि असा संयोग शाबीत झाला असला तरी बाकीच्या बाबी शाबीत झाल्या नसतील तेव्हा, त्या गौण अपराधाबद्दल त्याच्यावर दोषारोप ठेवलेला नसला तरीही, त्याला त्याबद्दल सिध्ददोष ठरवता येईल.
२) जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अपराधाचा दोषारोप ठेवलेला असून ज्यामुळे तो गौण अपराध ठरतो अशी तथ्ये शाबीत केलेली असतील तेव्हा, त्या गौण अपराधाचा त्याच्यावर दोषारोप ठेवलेला नसला तरीही, त्याला त्याबद्दल सिध्ददोष ठरवता येईल.
३) जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अपराधाचा दोषारोप ठेवलेला असेल तेव्हा, असा अपराध करण्याचा प्रयत्न केल्याचा वेगळा दोषारोप त्याच्यावर ठेवलेला नसला तरीही, त्याला त्या प्रयत्नाबद्दल सिध्ददोष ठरवता येईल.
४) कोणत्याही गौण अपराधाबाबत कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता झाली नसेल त्या बाबतीत, या कलमातील कोणतीही गोष्ट त्या गौण अपराधाबद्दलची दोषसिध्दी प्राधिकृत करत असल्याचे मानले जाणार नाही.
उदाहरणे :
(a) क) (क) कडे परिवाहक म्हणून सोपवण्यात आलेल्या मालाबाबत त्याने फौजदारीपात्र न्यासभंग केला असा भारतीय न्याय संहिता २०२३ यातील ३१६ च्या पोटकलम (३) खाली दोषारोप ठेवण्यात आला आहे. त्याने त्या मालाबाबत त्या संहितेच्या ३१६ च्या पोटकलम (२) खाली फौजदारीपात्र न्यासभंग केला, पण तो माल त्याच्याकडे परिवाहक म्हणून सोपवण्यात आलेला नव्हता असे दिसून येते. उक्त कलम ३१६ च्या पोटकलम (२) खाली फौजदारीपात्र न्यासभंगाबद्दल त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(b) ख) (क) ने जबर दुखापत केल्याबद्दल भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ११७ च्या पोटकलम (२) खाली त्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आला आहे. तीव्र व आकस्मिक प्रक्षोभनामुळे आपण ते कृत्य केले असे तो शाबीत करतो. त्या संहितेच्या १२२ च्या पोटकलम (२) खाली त्याला सिद्धदोष ठरवता येईल.