Bnss कलम २४३ : एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४३ :
एकाहून अधिक अपराधांची संपरीक्षा :
१) त्याच संव्यवहाराचे घटक होऊ शकतील अशा प्रकारे एकमेकींशी निगडित असलेल्या कृतींच्या एका मालिकेत जर त्याच व्यक्तीने एकाहून अधिक अपराध केले असतील तर, तिच्यावर अशा प्रत्येक अपराधाचा दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एकाच संपरीक्षेत संपरीक्षा करता येईल.
२) जेव्हा कलम २३५ च्या पोटकलम (२) मध्ये किंवा कलम २४२ च्या पोटकलम (१) मध्ये उपबंधित केल्याप्रमाणे फौजदारीपात्र न्यासभंग किंवा अप्रामाणिकपणे अपहार अशा एका किंवा अधिक अपराधांचा दोषारोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीवर, तो अपराध किंवा ते अपराध करणे सुकर होण्यासाठी किंवा ते केल्याचे लपवण्यासाठी तिने खोटे हिशेब दाखवण्याचा एक किंवा अधिक अपराध केले असल्याचा आरोप करण्यात आला असेल तेव्हा, अशा प्रत्येक अपराधाबद्दल तिच्यावर दोषारोप ठेवून त्याबद्दल तिची एका संपरीक्षेत संपरीक्षा करता येईल.
३) अभिकथित कृती मिळून अपराध घडलेला असून, त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यातील ज्या व्याख्यांद्वारे अपराधाची व्याख्या केलेली किंवा शिक्षा ठरवलेली असेल अशा दोन किंवा अधिक अलगअलग व्याख्यांमध्ये तो मोडत असेल तर, अशांपैकी प्रत्येक अपराधाबद्दल त्यांचा आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीवर दोषारोप ठेवून एका संपरीक्षेत तिची संपरीक्षा करता येईल.
४) ज्या अनेक कृतींपैकी एखादी कृती हीच किंवा एकाहून अधिक कृती या स्वयमेव अपराध आहेत त्या एकत्र केल्या असता एक वेगळा अपराध होत असेल तर, अशा एकत्रित कृतींमुळे होणाऱ्या अपराधाबद्दल आणि अशांपैकी कोणत्याही एका किंवा अधिक कृतींनी घडणाऱ्या अपराधाबद्दल, त्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींवर दोषारोप ठेवून एका संपरीक्षेत तिचीा संपरीक्षा करता येईल.
५) या कलमात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ९ वर परिणाम करणार नाही.
पोटकलम (१) ची उदाहरणे :
(a) क) कायदेशीर हवालतीत असलेल्या (ख) या व्यक्तीला (क) अवैधपणे सोडवतो, आणि तसे करताना (ख) ज्याच्या हवालातीत होता त्या (ग) या पोलीस शिपायाला जबर दुखापत करतो. (क) वर भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम १२१ च्या पोटकलम (२) व कलम २६३ यांखालील अपराधांचा दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(b) ख) बलात्कार करण्याच्या उद्देशाने (क) दिवसां घरफोडी करतो, आणि याप्रमाणे ज्या घरात त्याने प्रवेश केला त्या घरात (ख) च्या पत्नीशी बलात्कार करतो. (क) वर भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४ व कलम ३३१ च्या पोटकलम (३) याखालील अपराधांचे वेगवेगळे दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(c) ग) (क) च्या कब्जात अनेक मोहोरा असून त्या नकली असल्याचे त्याला माहीत आहे व भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३३७ खाली शिक्षापात्र असलेली अनेक बनावटीकरणाची कृत्ये करण्यासाठी त्या मोहोरा वापरण्याचा त्याचा उद्देश आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ३४१ च्या पोटकलम (२) खाली प्रत्येक मोहोर कब्जात बाळगल्याबद्दल (क) वर अलग अलग दोषारोप ठेवून त्यास सिद्धदोष ठरवता येईल.
(d) घ) (ख) विरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्यास न्याय्य किंवा कायदेशीर आधारकारण नाही हे माहीत असताना (ख) ला क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने (क) त्याच्याविरुद्ध तशी कार्यवाही सुरु करतो आणि (ख) ने अपराध केला असल्याचा दोषारोप त्याच्यावर ठेवण्यास न्याय्य किंवा कायदेशीर आधारकारण नाही हे माहीत असताना त्याच्यावर तसा खोटा आरोप करतो. भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम २४८ खाली दोन अपराधांबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(e) ङ) (ख) ने अपराध केला असल्याचा दोषारोप त्याच्यावर ठेवण्यास न्याय्य किंवा कायदेशीर आधारकारण नाही हे माहीत असाताना (क) त्याला क्षती पोचवण्याच्या उद्देशाने त्याच्यावर तसा खोटा आरोप करतो. देहान्त दंडास पात्र असलेल्या अपराधाबद्दल (ख) सिद्धदोष ठरावा या उद्देशाने संपरीक्षेच्या वेळी (क) हा (ख) विरुद्ध खोटी साक्ष देतो. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या २३० व २४८ या कलमाखालील अपराधांबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(f) च) दंगा करणे, जबर दुखापत करणे व दंगा मोडून काढण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकसेवकावर हमला करणे हे अपराध (क) हा अन्य सहाजणांसह करतो. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ११७ च्या पोटकलम (२), कलम १९१ च्या पोटकलम (२) आणि १९५ या कलमाखालील अपराधांबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(g) छ) (ख), (ग) व (घ) यांना भयभीत करण्याच्या उद्देशाने (क) त्यांना शारीरिक इजा करण्याची धमकी एकाचवेळी देतो. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ३५१ च्या पोटकलम (२) आणि पोटकलम (३) खालील तीन अपराधांपैकी प्रत्येकाबद्दल (क) वर दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(क) ते (छ) यांपैकी त्या त्या उदाहरणात निर्देशिलेल्या वेगवेगळ्या दोषारोपांची एकाचवेळी संपरीक्षा करता येईल.
पोटकलम (३) ची उदाहरणे :
(h) ज) (क) हा गैरपणे (ख) ला वेताने झोडपतो. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ११५ च्या पोटकलम (२) आणि १३१ या कलमाखाली (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
(i) झ) धान्याची अनेक चोरलेली पोती लपवण्याच्या हेतूने ती (क) व (ख) यांच्या स्वाधीन करण्यात येतात. तो चोरीचा माल आहे हे त्यांना माहीत आहे. त्यानंतर पोती शेताच्या तळाशी लपवण्यासाठी (क) व (ख) ऐकमेकांना स्वेच्छेने सहाय्य करतात. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ३१७ च्या पोटकलम (२) आणि पोटकलम (५) या खालील अपराधांबद्दल (क) आणि (ख) यांच्यावर अलगअलग दोषारोप ठेवून त्यांना सिद्धदोष ठरवता येईल.
(j) ञ) आपले मूल उघड्यावर सोडून दिल्यामुळे मरण्याचा संभव आहे हे माहीत असाताना (क) त्याला उघड्यावर टाकते. याप्रमाणे उघड्यावर टाकल्याचा परिणाम म्हणून ते मूल मृत्यू पावते. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या ९३ आणि कलम १०५ या कलमांखालील अपराधांबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून तिला सिद्धदोष ठरवता येईल.
(k) ट) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या २०१ व्या कलमाखालील अपराधाबद्दल (ख) या लोकसेवकाला सिद्धदोष ठरवण्याकरता अप्रामाणिकपणाने (क) हा बनावट दस्तवेज अस्सल पुरावा म्हणून वापरतो. त्या संहितेतील कलम २३३ (कलम ३३७ सहित) आणि कलम ३४० च्या पोठकलम (२) या खालील अपराधांबद्दल (क) वर अलगअलग दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.
पोटकलम (४) चे उदाहरण :
(l) ठ) (क) हा (ख) ची लूटमार करतो, आणि तसे करताना त्याला स्वेच्छापूर्वक दुखापत करतो. भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ११५ च्या पोटकलम (२) आणि कलम ३०९ च्या पोटकलम (२) आणि पोटकलम (४) या कलमांखालील अपराधांबद्दल (क) वर दोषारोप ठेवून त्याला सिद्धदोष ठरवता येईल.

Leave a Reply