Bnss कलम २२९ : किरकोळ अपराधांच्या प्रकरणात खास समन्स :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२९ :
किरकोळ अपराधांच्या प्रकरणात खास समन्स :
१) क्षुल्लक अपराधाची दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याच्या मते जर, कलम २८३ किंवा कलम २८४ खाली तो खटला संक्षेपत: निकालात काढता येत असेल तर, आरोपीला विनिर्दिष्ट दिनांकास दंडाधिकाऱ्यासमोर जातीनिशी किंवा वकिलामार्फ त उपस्थित राहण्यास अथवा दंडाधिकाऱ्यासमोर उपस्थित न होता दोषारोपाबाबत अपराधीपणाचे प्रतिकथन देण्याची त्याची इच्छा असल्यास, विनिर्दिष्ट दिनांकापूर्वी डाकेने किंवा निरोप्याकरवी दंडाधिकाèयकडे लेखी स्वरूपात उक्त प्रतिकथन आणि समन्समध्ये विनिर्दिष्ट केलेली द्रव्यदंडाची रक्कम पाठवण्यास अथवा वकिलामार्फ त उपस्थित राहून अशा वकिलामार्फ त अशा दोषारोपाबाबत अपराधीपणाचे प्रतिकथन देण्याची त्याची इच्छा असेल तर आपल्या वतीने वकिलाला लेखी प्राधिकृत करण्यास आणि अशा वकिलामार्फ त द्रव्यदंड भरवण्यास फर्मावणारे असे समन्स आरोपीवर काढता येईल मात्र त्याचे मत तसे करण्याविरूध्द असल्यास त्याची कारणे त्याल लेखी नमूद करावी लागतील :
परंतु, अशा समन्समध्ये विनिर्दिष्ट केलेली रक्कम पाच हजार रूपयांहून अधिक असणार नाही.
२) या कलमाच्या प्रयोजनार्थ क्षुल्लक अपराध याचा अर्थ जो पाच हजार रूपयांहून अधिक नाही इतक्या द्रव्यदंडाच्याच शिक्षेस पात्र आहे असा कोणताही अपराध असा आहे, पण त्यात मोटर वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याखाली किंवा आरोपी व्यक्तीला तिच्या अनुपस्थितीत अपराधीपणाच्या प्रतिकथनावरून सिध्ददोष ठरण्यासाठी उपबंध करणाऱ्या अन्य कोणत्याही कायद्याखाली याप्रमाणे शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाचा समावेश नाही.
३) राज्यशासन अधिसूनद्वारे कोणत्याही दंडाधिकाऱ्याला कलम ३५९ खाली मिटवण्याजोग्या अपराधाच्या अथवा जास्तीतजास्त तीन महिने मुदतीच्या कारावासास, किंवा द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असलेल्या अपराधाच्या संबंधात, खटल्याची तथ्ये व परिस्थिती विचारात घेता केवळ द्रव्यदंडाची शिक्षा देऊनच न्यायाची उद्दिष्ट साध्य होतील असे दंडाधिकाऱ्याचे मत असेल त्या बाबतीत पोटकलम (१) खाली प्रदान केलेले अधिकार वापरण्यासाठी खास अधिकार प्रदान करू शकेल.

Leave a Reply