Bnss कलम १०६ : विवक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १०६ :
विवक्षित मालमत्ता ताब्यात घेण्याचा पोलीस अधिकाऱ्याचा अधिकार :
१) जी मालमत्ता चोरीची असल्याचे अभिकथन करण्यात आले असेल किंवा तसा, संशय असेल अथवा ज्या परिस्थितीमुळे कोणताही अपराध करण्यात आल्याचा संशय निर्माण होतो अशा परिस्थितीत जी मालमत्ता सापडेल अशी कोणतीही मालमत्ता कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अभिग्रहण करता येईल.
२) असा पोलीस अधिकारी, जर तो पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास दुय्यम असेल तर, तत्काळ त्या अधिकाऱ्याला अभिग्रहणाचे वृत्त कळवील.
३) पोटकलम (१)खाली कार्य करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी अधिकारिता असणाऱ्या दंडाधिकाऱ्याला ताबडतोब अभिग्रहणाचे वृत्त कळवील व अभिग्रहण केलेली मालमत्ता, ती न्यायालयाकडे सोयीस्करपणे घेऊन जाणे शक्य होणार नाही अशा स्वरूपाची असेल त्या बाबतीत, किंवा अशी मालमत्ता ताब्यात ठेवण्यासाठी योग्य जागा मिळवणे कठीण असेल किंवा ती मालमत्ता सतत पोलीसांच्या ताब्यात ठेवणे हे अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी आवश्यक मानण्यात येत नसेल अशा बाबतीत आवश्यक करण्यात येईल त्याप्रमाणे व तेव्हा न्यायालयासमोर मालमत्ता हजर करण्याचे व तिच्या विल्हवाटीबाबतचे न्यायलयाचे पुढील आदेश अमलात आणण्याचे वचन देणारे बंधपत्र कोणत्याही व्यक्तीने करून दिल्यावर तो मालमत्तेचा ताबा तिला देऊ शकेल :
परंतु असे की, पोटकलम (१)अन्वये जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही वेगाने आणि नैसर्गिकपणे सडणारी असेल आणि जर अशा मालमत्तेच्या ताब्याला हक्कदार असणारी व्यक्ती माहीत नसेल किंवा गैरहजर असेल आणि अशा मालमत्तेचे मूल्य पाचशे रूपयांपेक्षा कमी असेल तर, तिची पोलीस अधीक्षकाच्या आदेशाव्दारे लिलावाने विक्री करण्यात येईल आणि कलमे ५०३ व ५०४ यांच्या तरतुदी व्ययहार्य असेल तितपत अशा विक्रीच्या निव्वळ उत्पन्नाला लागू असतील.

Leave a Reply