Bnss कलम ९८ : विवक्षित प्रकाशने जप्त करणे, घोषित करणे त्याकरता झडती वॉरंटे काढण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ९८ :
विवक्षित प्रकाशने जप्त करणे, घोषित करणे त्याकरता झडती वॉरंटे काढण्याचा अधिकार :
१) ज्या मजकुराचे प्रकाशन करणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम १५२ किंवा कलम १९६ किंवा कलम १९७ किंवा कलम २९४ किंवा कलम २९५ किंवा कलम २९९ खाली शिक्षापात्र आहे असा कोणताही मजकूर,
(a) क) (अ) कोणत्याही वृत्तपत्रात किंवा पुस्तकात, किंवा
(b) ख) (ब) कोणत्याही दस्तऐवजात- मग त्याचे मुद्रण कोठेही झालेले असो- अंतर्भुत आहे असे राज्य शासनाला दिसून येईल तेथे, राज्य शासनाला अधिसूचनेव्दारे, आपल्या मतामागील कारणे नमूद करून, असा मजकूर अंतर्भूत असलेली , वृत्तपत्राच्या अंकाची प्रत्येक प्रत व अशा पुस्तकाची किंवा अन्य दस्तऐवजाची प्रत्येक प्रत समपहत होऊन सरकारजमा झाली असल्याचे घोषित करता येईल व तदनंतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला भारतात जेथे कोठे ती सापडेल तेथे तेथे तिचे अभिग्रहण करता येईल आणि जेथे अशा अंकाची कोणतीही प्रत किंवा असे कोणतेही पुस्तक किंवा अन्य दस्तऐवज असेल किंवा असल्याचा वाजवी संशय येईल अशा कोणत्याही जागेत प्रवेश करून त्यासाठी झडती घेण्यास कोणताही दंडाधिकारी वॉरंटाव्दारे फौजदाराहून खालचा दर्जा नसलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला प्राधिकृत करू शकेल.
२) या कलमात व कलम ९९ मध्ये,
(a) क) (अ) वृत्तपत्र व पुस्तक यांना मुद्रण व पुस्तक- नोंदणी अधिनियम, १८६७ (१८६७ चा २५ ) यामध्ये दिल्याप्रमाणे तोच अर्थ आहे;
(b) ख) (ब) दस्तऐवज यात कोणतेही रंगचित्र, रेखाचित्र किंवा छायाचित्र किंवा अन्य दृश्य प्रतिरूपण यांचा समावेश आहे.
३) या कलमाखाली काढलेला कोणताही आदेश किंवा केलेली कोणतीही कारवाई कलम ९९ च्या उपबंधांचे अनुसरण केल्याशिवाय अन्यथा कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद केली जाणार नाही.

Leave a Reply