Ipc कलम ३८३ : बलाद्ग्रहण :

भारतीय दंड संहिता १८६०
बलाद्ग्रहणाविषयी अगर जुलमाने घेण्याविषयी :
कलम ३८३ :
बलाद्ग्रहण :
(See section 308 of BNS 2023)
एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे क्षती पोचवण्याची भीती घालून त्याद्वारे, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा अथवा मूल्यवान रोख्यांमध्ये रूपांतरित करता येईल अशी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित केलेली कोणतीही चीज सुपूर्त करण्यास अशा प्रकारे भीती घातलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो तो बलाद्ग्रहण करतो.
उदाहरणे :
क) (य) ने (क) ला पैसे दिले नाहीत तर (य) च्यासंबंधी अब्रूनुकसानकारक अपलेख प्रसिद्ध करण्याची (क) हा (य) ला धमकी देतो. तो अशा प्रकारे आपणांस पैसे देण्याकरिता (य) ला प्रवृत्त करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
ख) (य) ला (क) ने विवक्षित रक्कम देणे बंधनकारक करणाऱ्या वचनचिट्ठीवर (य) ने सही करुन ती चिट्ठी (क) ला सुपूर्द केली नाही तर (य) च्या मुलाला आपण गैरपणे परिरुद्ध करु अशी (क) हा (य) ला धमकी देतो. (य) त्या चिट्ठीवर सही करुन ती सुपूर्द करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
ग) (य) हा शेतीचचे विवक्षित उत्पन्न (ख) ला देईल, अन्यथा दंड भरील असे स्वत:वर बंधन घालणारे बंधपत्र (य) ने स्वाक्षरित करुन ते (ख) कडे सुपूर्द केले नाही तर, (य) च्या शेतावर नांगर फिरवण्यासाठी दंडुकेधारी माणसे पाठवण्यात येतील अशी (क) हा (य) ला धमकी देतो व त्याद्वारे तो (य) ला ते बंधपत्र करुन सुपूर्द करण्यास प्रवृत्त करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
घ) (य) ला जबर दुखापत करण्याची भीती घालून (क) हा (य) ने कोऱ्या कागदावर सही करुन किंवा आपला शिक्का मारुन तो (क) कडे सुपूर्द करावा म्हणून त्याला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (य) हा कागदावर सही करुन ती (क) कडे सुपूर्द करतो. याबाबतीत, अशा प्रकारे सही केलेल्या कोऱ्या कागदाचे मूल्यवान रोख्यामध्ये रुपान्तर होऊ शकत असल्यामुळे, (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.

Leave a Reply