भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६६ :
विवाह, इत्यादीची सक्ती करण्यासाठी स्त्रीचे अपनयन किंवा अपहरण करणे किंवा तिला प्रलोभित (प्रेरित) करणे :
(See section 87 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या स्त्रीला विवाहाची सक्ती करण्याच्या किंवा तिला शीलभ्रष्ट, इत्यादी करण्याच्या उद्देशाने तिचे अपनयन किंवा अपहरण करणे.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही व्यक्तीशी विवाह करण्याची सक्ती करता यावी या उद्देशाने किंवा तिच्यावर तशी सक्ती होईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असाताना, अथवा विधिनिषिद्ध संभोगाकरिता तिच्यावर बळजबरी करता यावी किंवा तिला तशी फूस लावता यावी या उद्देशाने अगर विधिनिषिद्ध संभोगाकरता तिच्यावर बळजबरी होईल किंवा तिला तशी फूस लावण्यात येईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना जो कोणी तिचे अपनयन किंवा अपहरण करील त्याला, दहा वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल; १.(आणि या संहितेमध्ये व्याख्या करण्यात आल्यानुसार फौजदारीपात्र धाकदपटशाच्या मार्गाने किंवा सत्तेचा दुरुपयोग करुन किंवा सक्तीच्या अन्य कोणत्याही उपायाने जो कोणी एखाद्या स्त्रीला दुसऱ्या व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याची तिच्यावर बळजबरी करता यावी किंवा तिला फूस लावता यावी या उद्देशाने अथवा त्याकरता तिच्यावर बळजबरी होईल किंवा तिला त्यासाठी फूस लावण्यात येईल याची जाणीव असताना एखाद्या ठिकाणाहून दूर जाण्यास प्रवृत्त करील तो देखील पूर्वोक्ताप्रमाणे (वरीलप्रमाणे) शिक्षेस पात्र असेल.)
———
१. १९२३ चा अधिनियम २० – कलम २ द्वारे या मजकुराची भर घालण्यात आली.