भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६३-अ:
१.(भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे अपनयन करणे किंवा तिला विकलांग करणे :
(See section 139 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या अज्ञान व्यक्तीला भीक मागण्यासाठी नेमता येवे किंवा त्या कामी तिचा वापर करुन घेता यावा यासाठी अशा अज्ञान व्यक्तीचे अपनयन करणे किंवा तिचा ताबा मिळवणे.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : एखाद्या अज्ञान व्यक्तीला भीक मागण्यासाठी नेमता यावे किंवा त्या कामी तिचा वापर करुन घेता यावा यासाठी अशा अज्ञान व्यक्तीला विकलांग करणे.
शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
(१) कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीचे अपनयन करील किंवा आपण अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना त्या अज्ञान व्यक्तीची अभिरक्षा मिळवील तो, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
(२) कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीला विकलांग करील तो आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
(३) आपण एखाद्या अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना जर कोणी भीक मागण्याच्या कामी अशी अज्ञान व्यक्तीची नेमणूक केली किंवा त्यासाठी तिचा वापर केला तर त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, त्या अज्ञान व्यक्तीला भीक मागण्यासाठी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता त्याने अज्ञान व्यक्तीचे अपनयन केले किंवा अन्यथा तिची अभिरक्षा मिळवली असे गृहीत धरण्यात येईल.
(४) या कलमात-
(अ) भीक मागणे याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे :
(एक) गाण्याचा, नाच करण्याचा, भविष्य सांगण्याचा, करामती करुन दाखवण्याचा किंवा वस्तूची विक्री करण्याचा किंवा अन्य प्रकारचा बहाणा करुन सार्वजनिक ठिकाणी भिकेची याचना करणे किंवा ती स्वीकारणे;
(दोन) भीकेची याचना करण्यासाठी किंवा भीक स्वीकारण्यासाठी कोणत्याही खासगी परिवास्तूमध्ये प्रवेश करणे;
(तीन) भीक मिळवण्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने, स्वत:चे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचे किंवा एखाद्या प्राण्याचे कोणतेही क्षत, जखम, इजा, विद्रूपता किंवा रोग उघडा करणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे;
(चार) भिकेची याचना करणे किंवा भीक मिळवणे यासाठी प्रदर्शनीय वस्तू म्हणून अज्ञान व्यक्तीचा वापर करणे.
(ब) अज्ञान व्यक्ती याचा अर्थ पुढीलप्रमाणे :
(एक) पुरुषाचे बाबतीत सोळा वर्षे वयाखालील व्यक्ती; आणि
(दोन) स्त्रीच्या बाबतीत, अठरा वर्षे वयाखालील व्यक्ती.)
——–
१. १९५९ चा अधिनियम ५२ – कलम २ द्वारे हे कलम समाविष्ट करण्यात आले.
