भारतीय न्याय संहिता २०२३
चोरीची मालमत्ता स्वीकारण्याविषयी :
कलम ३१७ :
चोरीची मालमत्ता:
कलम : ३१७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचचे माहीत असताना ती अप्रामाणिकपणे स्वीकारणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : चोरीच्या संपत्तीचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३१७ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीची मालमत्ता ती दरवड्याद्वारे मिळवण्यात आली असल्याचे माहीत असताना अप्रमाणिकपणे स्वीकारणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१७ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीच्या मालमत्तेचा नित्यश: व्यवहार करणे.
शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कलम : ३१७ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरीची मालमत्ता ही चोरीची असल्याचे माहीत असताना ती लपवून ठेवण्याच्या किंवा तिची वासलात लावण्याच्या कामी सहाय्य करणे.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : चोरीच्या संपत्तीचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) चोरी किंवा बलाद्ग्रहण किंवा जबरी चोरी यामुळे जिचा कब्जा हस्तांतरित झाला आहे ती मालमत्ता आणि जिचा फौजदारीपात्र अपहार झाला आहे, किंवा जिच्या बाबतीत फौजदारीपात्र न्यासभंग करण्यात आला आहे अशी मालमत्ता चोरीची मालमत्ता म्हणून संबोधण्यात येते. मग भारतात वा भारताबाहेर कोठेही ते हस्तांतर झालेले असो, अथवा तो अपहार किंवा न्यासभंग कोठेही करण्यात येवो; पण अशी मालमत्ता त्यानंतर जर, तिचा कब्जा घेण्यास विधित: हक्कदार असलेल्या व्यक्तीच्या कब्जात आली तर, ती चोरीची मालमत्ता असण्याचे बंद होते.
२) कोणतीही चोरीची मालमत्ता, ती चोरीची मालमत्ता आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवून घेईल, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जो कोणी दरोडा घातल्याने जिचा कब्जा हस्तांतरित झाला असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी कोणतीही चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारील किंवा ठेवून घेईल अथवा जी चोरीस गेल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी मालमत्ता, जी व्यक्ती दरोडेखोरांच्या टोळीपैकी असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशा व्यक्तीकडून अप्रामाणिकपणे स्वीकारील त्याला आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
४) जी चोरीची मालमत्ता असल्याचे स्वत:ला माहीत असेल, किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी मालमत्ता जो कोणी नित्यश: स्वीकारील, किंवा तिचा व्यवहार करील त्याला, आजन्म कारावासाची किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
५) जी चोरीची मालमत्ता असल्याचे स्वत:ला माहीत असेल किंवा तसे समजण्यास स्वत:ला कारण असेल अशी मालमत्ता लपवून ठेवण्याच्या, किंवा तिची वासलात लावण्याच्या, किंवा ती पळवून नेण्याच्या कामी जो कोणी इच्छापूर्वक साह्य करील, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.