भारतीय न्याय संहिता २०२३
बलाद्ग्रहणाविषयी अगर जुलमाने घेण्याविषयी :
कलम ३०८ :
बलाद्ग्रहण :
कलम : ३०८ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३०८ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी क्षती पोचचवण्याची भीती घालणे किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : २ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : ३०८ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा : ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३०८ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालून बलाद्ग्रहण करणे.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : ३०८ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू, आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास या शिक्षेस पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची भीती घालणे.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
धारा : ३०८ (७)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यू, आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास या शिक्षेस पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे.
शिक्षा : १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
१) एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे क्षती पोचवण्याची भीती घालून त्याद्वारे, कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा अथवा मूल्यवान रोख्यांमध्ये रूपांतरित करता येईल अशी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित केलेली कोणतीही चीज सुपूर्त करण्यास अशा प्रकारे भीती घातलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो तो बलाद्ग्रहण करतो.
उदाहरणे :
(a) क) (य) ने (क) ला पैसे दिले नाहीत तर (य) च्यासंबंधी अब्रूनुकसानकारक अपलेख प्रसिद्ध करण्याची (क) हा (य) ला धमकी देतो. तो अशा प्रकारे आपणांस पैसे देण्याकरिता (य) ला प्रवृत्त करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
(b) ख) (य) ला (क) ने विवक्षित रक्कम देणे बंधनकारक करणाऱ्या वचनचिट्ठीवर (य) ने सही करुन ती चिट्ठी (क) ला सुपूर्द केली नाही तर (य) च्या मुलाला आपण गैरपणे परिरुद्ध करु अशी (क) हा (य) ला धमकी देतो. (य) त्या चिट्ठीवर सही करुन ती सुपूर्द करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
(c) ग) (य) हा शेतीचचे विवक्षित उत्पन्न (ख) ला देईल, अन्यथा दंड भरील असे स्वत:वर बंधन घालणारे बंधपत्र (य) ने स्वाक्षरित करुन ते (ख) कडे सुपूर्द केले नाही तर, (य) च्या शेतावर नांगर फिरवण्यासाठी दंडुकेधारी माणसे पाठवण्यात येतील अशी (क) हा (य) ला धमकी देतो व त्याद्वारे तो (य) ला ते बंधपत्र करुन सुपूर्द करण्यास प्रवृत्त करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
(d) घ) (य) ला जबर दुखापत करण्याची भीती घालून (क) हा (य) ने कोऱ्या कागदावर सही करुन किंवा आपला शिक्का मारुन तो (क) कडे सुपूर्द करावा म्हणून त्याला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करतो. (य) हा कागदावर सही करुन ती (क) कडे सुपूर्द करतो. याबाबतीत, अशा प्रकारे सही केलेल्या कोऱ्या कागदाचे मूल्यवान रोख्यामध्ये रुपान्तर होऊ शकत असल्यामुळे, (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
(e) ङ) (क) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे, युक्ति ने (य) ला धमकी देतो की तुमचे मूल माझ्या ताब्यात आहे आणि तुम्ही मला एक लाख रुपए नाही दिले तर त्याला ठार मारले जाईल, (क) अशा प्रकारे (य) ला पैसे देण्यासाठी प्रवृत्त करतो. (क) ने बलाद्ग्रहण केले आहे.
२) जो कोणी बलाद्ग्रहण करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जो कोणी बलाद्ग्रहण करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे क्षती पोचवण्याची भीती घालील किंवा कोणत्याही व्यक्तीला तशी भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत करण्याची भीती घालील किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
५) एखाद्या व्यक्तीस जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत करण्याची भीती घालून बलाद्ग्रहण करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
६) बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीस जो कोणी तिने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने मृत्यू किंवा १.(आजन्म कारावास) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास अशा शिक्षेस पात्र असलेला अपराध केल्याचा, किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्या व्यक्तीविरूध्द किंवा त्या अन्य व्यक्तीविरूध्द करण्याची भीती घालील किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
७) एखाद्या व्यक्तीला जो कोणी तिने किंवा अन्य कोणाही व्यक्तीने मृत्यू किंवा आजन्म कारावास, किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास अशा शिक्षेस पात्र असलेला कोणताही अपराध केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा, किंवा असा अपराध करण्यास अन्य कोणत्याही इसमाला प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या विरूध्द किंवा त्या अन्य व्यक्तीविरूध्द करण्याची भीती घालून बलाद्ग्रहण करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.