गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४३ :
सार्वजनिक ठिकाणी जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार :
कलम ४२ मध्ये नमूद करण्यात आलेल्यांपैकी कोणतयाही विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला –
अ) प्रकरण चार अन्वये शिक्षा योग्य असलेला एखादा अपराध ज्यांच्या बाबतीत घडला आहे असे त्याला वाटण्यास कारण असेल अशी कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात असताना जप्त करता येईल आणि अशी औषधी द्रव्ये किंवा पदार्थ यांच्याबरोबरच या अधिनियामान्वये सरकारजमा करण्यास पात्र असलेला कोणताही प्राणी किंवा वाहन किंवा वस्तू, अशा औषधी द्रव्यांच्या किंवा पदार्थांच्या संबंधात अन्वये शिक्षायोग्य असा अपराध घडल्याचा पुरावा म्हणून सादर करता येतील, असे त्याला सकारण वाटेल असे कोणतेही दस्तऐवज किंवा इतर वस्तुसुद्धा जप्त करू शकेल.
ब) अन्वये शिक्षायोग्य असा कोणताही अपराध कोणत्याही व्यक्तीने केला आहे असे त्याला सकारण वाटल्यास, अशा व्यक्तीला स्थानबद्ध करून तिची झडती घेऊ शकेल आणि अशा व्यक्तीच्या ताब्यात कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ असतील आणि असा ताबा बेकायदेशीर आहे असे त्याला वाटल्यास, तो त्या व्यक्तीला व तिच्यासोबत असणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी सार्वजनिक ठिकाण या संज्ञेत सार्वजनिक वाहन, हॉटेल, स्टॉप (थांबा) किंवा लोकांनी वापरावी असा उद्देश असलेली किंवा त्यांना प्रवेश असलेली जागा यांचा समावेश होतो.
