गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम १० :
परवानगी देणे, नियंत्रण ठेवणे व विनियमन करण्याचा राज्य सरकारचा अधिकार :
१) कलम ८ च्या तरतुदींच्या अधीन राहून राज्य सरकार नियमांद्वारे,
अ) पुढील गोष्टींची परवानगी देऊ शकेल व त्यांचे विनियमन करू शकेल.
एक) अफूचे गवत कब्जात ठेवणे, त्याची वाहतूक आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात करणे, ते वखारीत ठेवणे, त्याची विक्री, खरेदी, सेवन आणि वापर करणे;
दोन) अफू कब्जात ठेवणे, तिची वाहतूक, आंतरराज्यीय आयात आंतरराज्यीय निर्यात, विक्री, खरेदी, सेवन व वापर करणे.
तीन) कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीची लागवड करणष, (चरस धरून) कोणत्याही कॅनॅबिसचे उत्पादन, निर्मिती करणे, ती कब्जात ठेवणे, तिची वाहतूक, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात, विक्री, खरेदी, सेवन, किंवा वापर करणे.
चार) औषधी वापरासाठीच्या अफूची किंवा एखादा उत्पादक जी सामग्री कब्जात ठेवण्यास कायद्याने हक्कदार असेल त्या सामग्रीपासून बनलेले कोणतेही निर्मित औषधी द्रव्य अंतर्भूत असलेल्या कोणत्याही सिद्ध पदार्थाची निर्मिती करणे.
पाच) सिद्ध केलेल्या अफूव्यतिरिक्त इतर निर्मित औषधी द्रव्ये आणि कोका पाने आणि कोणतेही निर्मित औषधी द्रव्य अतंर्भूत असलेला कोणताही सिद्धपदार्थ कब्जात ठेवणे, त्याची वाहतूक, खरेदी, विक्री, आंतरराज्यीय आयात, आंतरराज्यीय निर्यात वापर किंवा सेवन करणे.
सह) राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या व्यसनी व्यक्तीने तिच्या व्यक्तिगत सेवनासाठी वैद्यकीय सल्लावरून, तिने कायदेशीर कब्जात ठेवलेल्या अफूपासून, सिद्ध केलेल्या अफूची निर्मिती करणे व ती कब्जात ठेवणे.
परंतु, उप-खंड (चार) व (पाच) नुसार केलेल्या नियमांमध्ये स्पष्टपणे तरतूद केलेली असेल तेवढे वगळता एरवी कलम ८ मधील कोणतीही गोष्ट शासनाची मालमत्ता असलेल्या व शासनाच्या कब्जात असलेल्या अशा निर्मित औषधी द्रव्यांच्या आंतरराज्यीय आयातीला, आंतरराज्यीय निर्यातीला, वाहतुकीला, कब्जात असलेल्या अशा निर्मित औषधी द्रव्यांच्या आंतरराज्यीय आयातीला, आंतरराज्यीय निर्यातीला, वाहतुकीला, कब्जाला, खरेदीला, विक्रीला, वापराला किंवा सेवनाला लागू होणार नाही.
परंतु आणखी असे की, या आधीच्या परंतुकामध्ये उल्लेखकेलेली अशी औषधी द्रव्ये, जी कोणतीही व्यक्ती राज्य सरकारने पूर्वोक्त उपखंडाखाली केलेल्या नियमांनुसार अशी औषधी द्रव्ये कब्जात ठेवण्यास हक्कदार नसेल त्या व्यक्तीला विकण्यात येणार नाहीत किंवा अन्य प्रकारे तिच्या स्वाधीन करण्यात येणार नाहीत.
ब) खंड (अ) मध्ये नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींवर राज्य सरकारचे परिणामकारक नियंणि राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असतील अशा इतर कोणत्याही गोष्टी ठरवून देऊ शकेल.
२) विशेषत: आणि याआधीच्या अधिकाराला बाध न येता अशा नियमांन्वये पुढील गोष्टी करता येतील-
अ) कायदेशीरपणे आंतरराज्यीय आयात केलेले आणि आंतरराज्यीय निर्यात किंवा भारतातून निर्यात करण्याचा उद्देश असलेले असे अफूचे सर्व गवत ज्या ठिकाणी ठेवणे मालकांचे कर्तव्ये असेल असे कोणतेही ठिकाण वखार म्हणून घोषित करण्याचा; वखारीत साठवलेल्या अशा अफूच्या सुरक्षित ताब्याचे आणि विक्रीसाठी किंवा आंतरराज्यीय निर्यातीसाठी किंवा भारतातून निर्यात करण्यासाठी असे अफुचे गवत हलवण्याचे विनियमन करण्याचा; अशा वखार साठवण्यासाठी शुल्क बसवण्याचा आणि वखारीत साठवलेल्या अफूच्या गवताचे शुल्क भरण्यात कसूर झाल्यास ज्या रीतीने आणि ज्या कालावधीनंतर विल्हेवाट लावण्यात येईल ती रीत व तो कालावधी ठरवून देण्याचा अधिकार राज्य शासनाला देणे.
ब) कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीच्या लागवडीसाठी ज्या सीमांच्या आत अनुज्ञप्ती (लायसन्स) देता येतील त्या सीमा वेळोवळी राज्य सरकारच्या आदेशांद्वारे किंवा त्यांअन्वये निश्चित करण्यात येतील अशी तरतूद करणे.
क) ठरवून दिलेल्या प्राधिकरणाने किंवा राज्य सरकारने अनुज्ञप्ती (लायसन्स) दिलेले लागवडदारच फक्त, कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीच्या लागवडीचे काम करण्यास अधिकार प्राप्त असतील, अशी तरतूद करणे.
ड) लागवडदार सर्व कॅनॅबिस, कॅनॅबिस वन्सपतीची लागवड केलेल्या जमिनीचे उत्पादन, राज्य सरकारने या संबंधात अधिकार दिलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतील असे आवश्यक करणे.
ई) स्वाधीन केलेल्या कॅनॅबिससाठी लागवडदारांना द्यावयाची किंमत वेळोवेळी निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला देणे.
फ) पोट-कलम (१) च्या खंड (अ) चे उपखंड (एक) ते (चार) यांमध्ये नमूद केलेल्या प्रयोजनांसाठी लागणाऱ्या लायसंनाचे किंवा परवान्यांचे नमुने आणि त्यांच्या शर्ती व जी प्राधिकरणे अशी अनुज्ञप्ती (लायसन्स) किंवा परवाने देऊ शकतील ती लायसने व त्यासाठी आकारता येईल असे शुल्क, ठरवून देणे.
