भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २२८ :
खोटा पुरावा रचणे :
जर कोणी एखादी विशिष्ट परिस्थिती घडवून आणली किंवा कोणत्याही पुस्तकात किंवा अभिलेखात किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखात खोटी नोंद करील किंवा खोटे कथन असलेला कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख करील ज्याचा इरादा या तीन गोष्टी न्यायिक कार्यवाहीमधील अथवा एखाद्या लोकसेवका समोर त्या नात्याने अगर लवादासमोर आणलेल्या कार्यवाहीतील पुराव्यामध्ये यावे आणि असा परिस्थितिविशेष, खोटी नोंद किंवा खोटे कथन याप्रमाणे पुराव्यात येण्यामुळे त्या कार्यवाहीत ज्या व्यक्तीने त्या पुराव्यावरून आपले मत बनवावयाचे असेल तिला अशा कार्यवाहीच्या निकालाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कोणत्याही मुद्दयासंबंधी एखादे चुकीचे मत बनवणे भाग पाडावे, असा त्याचा उद्देश असेल तर, त्याने खोटा पुरावा रचला असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) च्या पेटीमध्ये रत्ने ठेवतो, उद्देश हा की, तो त्या पेटीत सापडावीत, आणि त्या विशिष्ट परिस्थितीमुळे (य) हा चोरीबद्दल सिद्धदोष ठरावा. (क) ने खोटा पुरावा रचलेला आहे.
(b) ख) (क) आपल्या दुकानाच्या हिशेबवहीत खोटी नोंद करतो, प्रयोजन असे की, न्यायालयात ती परिपोषक पुरावा म्हणून वापरता यावी. (क) ने खोटा पुरावा रचलेला आहे.
(c) ग) फौजदारीपात्र कटाबद्दल (य) ची दोषसिद्धी घडवावी या उद्देशाने (क) हा (य) च्या हस्ताक्षराची नक्कल करुन, फौजदारीपात्र कटातील सहअपराध्यास उद्देशून लिहिले असल्याचे दिसणारे असे एक पत्र लिहितो, आणि ते पत्र पोलीस अधिकारी जेथे झडती घेण्याचा संभव आहे याची त्याला जाणीव आहे त्या जागी ठेवतो. (क) ने खोटा पुरावा रचलेला आहे.