भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २०८ :
लोकसेवकाने दिलेल्या आदेशानुसार उपस्थित न राहणे :
कलम : २०८ (क) (अ)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवक्षित स्थळी जातीने किंवा अभिकर्त्यामार्फत हजर राहण्याचा वैध आदेश न पाळणे किंवा प्राधिकार नसता तेथून निघून जाणे.
शिक्षा : १ महिन्याचा साधा कारावास किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : २०८ (ख) (ब)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जर आदेशाद्वारे न्यायालयात जातीने हजर राहणे, इत्यादी आवश्यक केले असेल तर.
शिक्षा : ६ महिन्याचा साधा कारावास किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
लोकसेवक म्हणून समन्स, नोटीस, आदेश अगर जाहीरनामा काढण्यास विधित: (कायद्याने) सक्षम असलेल्या कोणत्याही लोकसेवकाकडून ते निघाले असता त्याच्या अनुपालनार्थ (पालनाकरिता) विवक्षित (विशिष्ट) स्थळी आणि वेळी जातीने किंवा अभिकर्त्यामार्फत (एजंटातर्फे) हजर राहण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधला) असलेला जो कोणी, त्या स्थळी किंवा त्या वेळी हजर राहण्याचे उद्देशपूर्वक टाळील अगर ज्या ठिकाणी हजर राहण्यास तो बद्ध (बांधलेला) आहे तेथून ज्या वेळी निघून जाणे कायदेशीर आहे त्या वेळेपूर्वी निघून जाईल,-
(a) क) (अ) त्याला एक महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील;
(b) ख) (ब) जर समन्स, नोटीस, आदेश, अगर जाहीरनामा न्यायालयात जातीने किंवा अभिकर्त्यामार्फत (एजंटामार्फत) हजर राहण्याविषयी असेल तर, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल. इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरणे :
(a) क) उच्च न्यायांलयाने काढलेल्या साक्षीसमन्साच्या अनुपालनार्थ त्या न्यायालयासमोर उपस्थित होण्यास विधित: बद्ध असलेला (क) उपस्थित होण्याचे उद्देशपूर्वक टाळतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.
(b) ख) जिल्हा न्यायाधीशाने काढलेल्या समन्सच्या अनुपालनार्थ साक्षीदार म्हणून त्या जिल्हा न्यायाधीशासमोर उपस्थित होण्यास विधित: बद्ध असलेला (क) उपस्थित होण्याचे उद्देशपूर्वक टाळतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.