Bns 2023 कलम १९३ : जेथे बेकायदेशीर जमाव किंवा दंगा केला गेला आहे तेव्हा जमिनीचा मालक किंवा ताबा धारकाचे दायित्व, इत्यादी :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९३ :
जेथे बेकायदेशीर जमाव किंवा दंगा केला गेला आहे तेव्हा जमिनीचा मालक किंवा ताबा धारकाचे दायित्व, इत्यादी :
कलम : १९३ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जमिनाचा मालक किंवा ताबाधारक याने दंगा इत्यादींची खबर न देणे.
शिक्षा : १००० रुपये द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १९३ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जिच्या हितार्थ किंवा जिच्या वतीने दंगा घडवून आणला असेल त्या व्यक्तीने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शक्य ते सर्व कायदेशीर उपाय न योजणे.
शिक्षा : द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १९३ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यांच्या हितार्थ दंगा घडवून आणला असेल त्या मालकाच्या किंवा ताबाधारकाच्या अभिकर्त्याने त्यास प्रतिबंध करण्यासाठी शक्य ते सर्व कायदेशीर उपाय न योजणे.
शिक्षा : द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जेव्हाकेव्हा कोणताही बेकायदेशीर जमाव जमेल दंगा होईल तेव्हा, ज्या जमिनीवर असा जमाव जमला असेल किंवा दंगा झाला असेल अशा जमिनीचे मालक किंवा ताबाधारक आणि अशा जमिनीत हितसंबंध असलेला किंवा हितसंबंध असल्याचा दावा सांगणारा इसम यांना जर असा अपराध घडत आहे किंवा घडलेला आहे हे त्यांना माहीत असून किंवा तो अपराध घडणे संभवनीय असे समजण्यास कारण असताना त्याने किंवा त्याचा अभिकर्ता किंवा व्यवस्थापक यांनी त्याच्या किंवा त्यांच्या शक्तीनुसार लवकरात लवकर सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्यावरील प्रधान अधिकाऱ्याला त्याची दखल (खबर) दिली नाही आणि तो अपराध घडण्याच्या बेतात आहे असे समजण्यास त्याला किंवा त्यांना कारण असेल त्याबाबतीत, त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्याच्या किंवा त्यांच्या शक्तीनुसार सगळ्या कायदेशीर साधनांचा वापर केला केला नाही आणि जर दंगा घडून आला, तर तो शमविण्यासाठी किंवा बेकायदेशीर जमाव पांगविण्यासाठी त्याच्या किंवा त्यांच्या शक्तीनुसार सगळ्या कायदेशीर साधनांचा वापर केला नाही तर, ते जास्तीत जास्त एक हजार रूपये इतक्या द्रव्यदंडास पात्र होतील.
२) एखाद्या जमिनीबाबत दंगा होतो अशा कोणत्याही जमिनीचा मालक किंवा ताबाधारक असलेल्या अशा अथवा अशा जमिनीत किंवा ज्यामुळे दंगा झाला अशा कोणत्याही तंटयाच्या विषयवस्तूत (संबंधात) कोणाताही हितसंबंध असल्याचा दावा सांगणाऱ्या अथवा त्यापासून कोणताही फायदा स्वीकारणाऱ्या किंवा मिळणाऱ्या अशा कोणत्याही इसमाच्या (व्यक्तीच्या) हितासाठी किंवा त्याच्या वतीने जेव्हाकेव्हा दंगा होईल तेव्हा असा इसम (व्यक्ती), जर असा दंगा होणे संभवनीय आहे किंवा ज्याने असा दंगा केला तर तो बेकायदेशीर जमाव जमणे संभवनीय असे समजण्यास कारण असताना त्याने किंवा त्याचा अभिकर्ता किंवा व्यवस्थापक यांनी अनुक्रमे असा जमाव जमण्याला किंवा दंगा होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि तो दंगा शमविण्यासाठी आणि असा जमाव पांगविण्यासाठी त्याच्या किंवा त्यांच्या शक्तीनुसार सर्व कायदेशीर साधनांचा वापर केला नाही, तर तो जमीनमालक द्रव्यदंडास पात्र होईल.
३) ज्या जमिनीबाबत दंगा होतो अशा कोणत्याही जमिनीचा मालक किंवा ताबाधारक असलेल्या अशा अथवा अशा जमिनीत किंवा ज्यामुळे दंगा झाला अशा कोणत्याही तंट्याच्या विषयवस्तूत कोणताही हितसंबंध असल्याचा दावा सांगणाऱ्या अथवा त्यापासून कोणताही फायदा स्वीकारणाऱ्या किंवा मिळणाऱ्या अशा कोणत्याही इसमाच्या हितासाठी किंवा त्याच्या वतीने जेव्हाकेव्हा दंगा होईल तेव्हा, अशा इसमाचा अभिकर्ता किंवा व्यवस्थापक, जर असा दंगा होणे संभवनीय आहे किंवा ज्याने असा दंगा केला तो बेकायदेशीर जमाव जमणे संभवनीय आहे असे समजण्यास कारण असताना अशा अभिकर्त्याने किंवा व्यवस्थापकाने असा जमाव जमण्याला किंवा दंगा होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि तो दंगा शमवण्यासाठी व जमाव पांगवण्यासाठी त्याच्या शक्तीनुसार सर्व कायदेशीर साधनांचा अवलंब केला नाही तर, द्रव्यदंडास पात्र होईल.

Leave a Reply