अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ६९ :
अपराधांची तडजोड करण्याचा अधिकार (शक्ती) :
१) अन्न (खाद्य) सुरक्षा आयुक्त, निर्देशित अधिकाऱ्यास, आदेशाद्वारे, किरकोळ उत्पादक जे स्वत: अन्न (खाद्य) पदार्थाचे उत्पादन करतात आणि त्याची किरकोळ विक्रेते, फेरीवाले, फिरते विक्रेते, तात्पुरत्या बाकड्यांचे मालक यांना विक्री करतात यांच्याविरुद्ध त्यांनी अपराध केल्याबाबत किंवा या अधिनियमाचे उल्लंघन केल्याबाबत योग्य विश्वास वाटल्यास, अशा व्यक्तीने जो अपराध केल्याचा संशय असेल त्याच्या तडजोडीची रक्कम स्वीकारण्याचे अधिकार देईल.
२) अशा तडजोडीची रक्कम निर्देशित अधिकाऱ्याला दिल्यानंतर, संशयित व्यक्ती अभिरक्षेत (कोठडीत) घेतलेली असेल तर तिला मुक्त केले जाईल व त्या अपराधाबाबत पुढील कोणतीही कार्यवाही अशा व्यक्ती विरुद्ध केली जाणार नाही.
३) पोटकलम (१) अंतर्गत स्वीकारलेली तडजोडीची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा अधिक असणार नाही आणि कलम ४९ मध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा सम्यक रुपात विचार केला जाईल :
परंतु असे की, या अधिनियमाद्वारा अपराधास कारावासाची शिक्षा विहित केलेली आहे अशा अपराधाबाबत तडजोड होणार नाही.
