अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम १७ :
अन्न (खाद्य) प्राधिकरणाची कार्यवाही :
१) अन्न (खाद्य) प्राधिकरणाची बैठक मुख्यालयात किंवा इतर कोणत्याही कार्यालयात अध्यक्षांनी निर्देशित केलेल्या वेळेवर होईल, आणि या बैठकीत (त्याच्या बैठकीचे आवश्यक गणपूर्तीसह) बैठकीतील कामकाजाच्या व्यवहारासंबंधीच्या प्रक्रियामध्ये अशा नियमांचे पालन केले जाईल जे विनियमां द्वारा नमूद केले असेल.
२) जर अध्यक्ष, या अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या बैठकीस हजर राहू शकत नसल्यास, या निमित्त अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेला इतर कोणताही सदस्य आणि असा नामनिर्देशित केलेला सदस्य नसेल तर सर्व हजर सदस्यांतून निवडलेला सदस्य बैठकीचा अध्यक्ष म्हणून काम पाहील.
३) अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या कोणत्याही बैठकीसमोर येणारे सर्व प्रश्न, ते उपस्थित व मताधिकार असलेल्या सदस्यांच्या बहुमताने निर्णित केले जातील, व मतांच्या समानतेच्या बाबतीत, अध्यक्ष किंवा अध्यक्षता करणाऱ्या सदस्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार असेल.
४) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे सर्व आदेश आणि विनिश्चय (निर्णय) मुख्य कार्यपालक अधिकारी यांच्याद्वारे प्रमाणित केले जातील.
५) मुख्य कार्यकारी अधिकारी अन्न (खाद्य) प्राधिकरणाच्या बैठकांमध्ये सहभागी होतील परंतु त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही.
६) अन्न (खाद्य) प्राधिकरण वैज्ञानिक समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करु शकेल परंतु त्यांनाही मतदानाचा अधिकार असणार नाही.
७) अन्न (खाद्य) प्राधिकरणाचे कोणतेही काम किंवा कामकाज केवळ अन्न (खाद्य) प्राधिकरणातील सदस्यांची जागा रिक्त आहे किंवा त्याच्या घटनेत कोणतीही त्रुटी आहे या कारणावरुन प्रश्नांकि केले जाणार नाही किंवा अवैध ठरणार नाही.
