भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९९ :
वेश्या व्यवसाय, इ. प्रयोजनार्थ बालकाची खरेदी करणे :
कलम : ९९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : वेश्याव्यवसाय इत्यादी प्रयोजनार्थ बालकाची खरेदी करणे किंवा तिचा कब्जा मिळवणे.
शिक्षा : कमीत कमी ७ वर्षाचा कारावास परंतु १४ वर्षापर्यंत वाढविता येईल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
कोणत्याही बालकाला वेश्या व्यवसायाच्या किंवा कोणत्याही व्यक्तींशी विधिनिषिद्ध संभोग करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा कोणत्याही बेकायदेशीर आणि अनैतिक प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला कामी लावले जावे किंवा त्यासाठी त्याचा वापर केला जावा या उद्देशाने अथवा असे बालक अशा कोणत्याही प्रयोजनार्थ कोणत्याही वयाला कामी लावण्यात येईल किंवा त्यासाठी त्याचा वापर करण्यात येईल तसा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना जो कोणी अशा बालकाची खरेदी करील, त्याला भाड्याने घेईल किंवा त्याचा अन्यथा कब्जा मिळवील त्याला, सात वर्षाहून कमी नसेल परंतु चौदा वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीच्या दोन्हीपैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होर्ईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण एक :
जी कोणतीही वेश्या व्यक्ती किंवा वेश्यागृह बाळगणारी किंवा त्याची व्यवस्था पाहणारी कोणतीही व्यक्ती अठरा वर्षे वयाखालील स्त्रीची खरेदी करील, तिला भाड्याने घेईल किंवा तिचा अन्यथा कब्जा मिळवील त्या व्यक्तीने, वेश्या व्यवसायासाठी अशा स्त्रीचा उपभोग केला जावा अशा उद्देशाने तिचा कब्जा मिळवला असे, त्याविरुद्ध शाबीत करण्यात येईपर्यन्त, गृहीत धरण्यात येईल.
स्पष्टीकरण दोन :
विधिनिषिद्ध संभोग याला कलम ९८ मध्ये दिल्याप्रमाणे तोच अर्थ असेल.