भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५१ :
जेव्हा एका कृतीला अपप्रेरणा (चिथावणी) दिली जाऊन निराळी कृती केली जाते तेव्हा अपप्रेरकाचे (चिथावणी देणाऱ्याचे) दायित्व (शिक्षेची जबाबदारी) :
कलम : ५१
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अपराधाचे अपप्रेरण, जेव्हा एका कृतीला अपप्रेरणा दिली जाऊन निराळी कृती केली जाते तेव्हा परंतुकाच्या अधिनतेन.
शिक्षा : ज्या अपराधाला अपप्रेरणा देणे उद्देशित होते त्याला असेल तीच
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जेव्हा एखाद्या कृतीला अपप्रेरणा (चिथावणी) दिली जाऊन निराळीच कृती केली जाते तेव्हा, घडलेल्या कृतीबद्दल अपप्रेरक (चिथावणी देणारा) जणू काही त्याने तिला प्रत्यक्षपणे त्यासाठीच अपप्रेरणा (चिथावणी) दिलेली असावी त्याप्रमाणे त्याच रीतीने व त्याच व्याप्ती पर्यंत दायी (जबाबदार) असतो.
परंतु घडलेली कृती हा अपप्रेरणाचा (चिथावणीचा) संभाव्य परिणाम असला पाहिजे, आणि अपप्रेरणाला (चिथावणीला) घटकभूत अशा चिथावणीच्या प्रभावामुळे किंवा अशा साहाय्यामुळे किंवा अशा कटानुसार ती घडलेली असली पाहिजे.
उदाहरणे :
(a) क) (क) एका बालकाला (य) च्या अन्नात विष घालण्यास चिथावणी देतो, आणि त्यासाठी त्याच्याकडे विष देतो. चिथावणीचा परिणाम म्हणून ते बालक (य) च्या अन्नाजवळ असलेल्या (म) च्या अन्नात भूलचुकीने विष घालते. याबाबतीत जर ते बालक (क) च्या चिथावणीच्या प्रभावामुळे तसे वागले असेल, आणि घडलेली कृती ही त्या परिस्थितीत अपप्रेरणाचा संभाव्य परिणाम असेल तर, (क) हा जणू काही त्याने त्या बालकाला (य) च्या अन्नात विष घालण्यास चिथावणी दिलेली असावी त्याप्रमाणे त्याच रीतीने व त्या व्याप्तीपर्यंत दायी आहे.
(b) ख) (क) हा (ख) ला (य) चे घर जाळण्यास चिथावणी देतो. (ख) घराला आग लावतो आणि त्याचवेळी तेथील मालमत्तेची चोरी करतो. (क) हा घराला आग लावण्यास अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी असला तरीही, चोरीस अपप्रेरणा दिल्याबद्दल दोषी नाही; कारण चोरी ही भिन्न कृती असून तो आगीचा परिणाम नाही.
(c) ग) जबरी चोरी करण्यासाठी मध्यरात्री एक वस्ती असलेले घर फोडण्यास (क) हा (ख) व (ग) यांना चिथावणी देतो, आणि त्या प्रयोजनासाठी त्यांना शस्त्रे पुरवतो. (ख) व (ग) घरात घुसतात आणि आत राहणाऱ्यांपैकी (य) ने प्रतिकार केल्यामुळे ते त्याचा खून करतात. याबाबतीत, तो खून जर अपप्रेरणाचा संभाव्य परिणाम असेल तर, खुनासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेत्र (क) पात्र आहे.