हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १३-ख :
१.(परस्परसंमतीने घटस्फोट :
१) या अधिनियमाच्या उपबंधांच्या अधीनतेने, विवाहसंबंधातील दोन्ही पक्ष – मग तो विवाह विवाहविषयक कायदे (विशोधन) अधिनियम १९७६ (१९७६ चा ६८) याच्या प्रारंभापूर्वी लावलेला असो वा नंतर लावलेला असो, – अशा कारणास्तव जिल्हा न्यायालयाकडे घटस्फोटाच्या हुकूमनाम्याद्वारे विवाहाचा विच्छेद करण्याविषयीचा विनंतीअर्ज एकत्र सादर करु शकतील की, ते दोन्ही पक्ष एक वर्ष वा त्याहून अधिक काळ वेगवेगळे राहत आहेत किंवा ते एकत्र राहू शकलेले नाहीत आणि विवाहाचा विच्छेद् करावा याबाबत त्यांचे परस्परांत एकमत झाले आहे.
२) पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेला विनंतीअर्ज सादर केल्याच्या दिनांकानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यावर आणि उक्त दिनांकापासून अठरा महिन्यांचा कलावधी पूर्ण होण्याच्या आत दोन्ही पक्षांनी चालना-अर्ज केल्यावर, जर दरम्यानच्या काळात विनंतीअर्ज मागे घेण्यात आलेला नसेल तर, न्यायालय, दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर व त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यावर, तो विवाह विधिपूर्वक लावण्यात आलेला होता आणि विनंतीअर्जातील प्रकथन सत्य होते अशी स्वत:ची खात्री झाल्यास, घटस्फोटाचा हुकूमनामा करील आणि हुकूमनाम्याच्या तारखेपासून विवाहाचा विच्छेद झाल्याचे जाहीर करील.)
———-
१. १९७६ चा अधिनियम ६८ कलम ७ द्वारे कलम ८ द्वारे घातले.