हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६
कलम १० :
अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये संपत्तीचे वितरण :
अकृतमृत्युपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या १ ल्या वर्गामधील वारसदारांमध्ये पुढील नियमानुसार विभागली जाईल :-
नियम १ :
अकृतमुत्युपत्र व्यक्तीच्या विधवेला, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर, सर्व विधवांना एकत्रितपणे एक हिस्सा मिळेल.
नियम २ :
अकृतमृत्युपत्र व्यक्तीचे हयात असलेले पुत्र आणि कन्या आणि माता यांना प्रत्येकी एक हिस्सा मिळेल.
नियम ३ :
अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या प्रत्येक पूर्वमृत पुत्राच्या किंवा प्रत्येक पूर्वमृत कन्येच्या शाखेतील वारसदारांना आपसात मिळून एक हिस्सा मिळेल.
नियम ४ :
नियम ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या हिश्श्याचे वितरण :
एक) पूर्वमृत पुत्राच्या शाखेतील वारसदारांमध्ये अशाप्रकारे करण्यात येईल की, त्याची विधवा (किंवा त्याच्या विधवा एकत्रितपणे) आणि हयात असलेले पुत्र व कन्या यांना समान अंश मिळतील; आणि त्याच्या पूर्वमृत पुत्रांच्या शाखेस तेवढाच अंश मिळेल ;
दोन) पूर्वमृत कन्येच्या शाखेतील वारसदारांमध्ये अशाप्रकारे करण्यात येईल की, हयात असलेल्या पुत्रांना आणि कन्यांना समान अंश मिळतील.
