अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ९ :
शक्ती (अधिकार) प्रदान (बहाल) करणे :
१)संहितेमध्ये किंवा या अधिनियमाच्या अन्य कोणत्याही उपबंधामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात-
ऐ)या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी; किंवा
बी)या अधिनियमाखालील कोणत्याही प्रकरणासाठी किंवा प्रकरणांचा वर्ग किंवा गट यांसाठी राज्य शासन, राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला, तसे करणे राज्य शासनास योग्य किंवा समयोजित वाटेल तर, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या संहितेअन्वये अशा जिल्ह्यातील किंवा प्रकरणपरत्वे, त्याच्या भागातील एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडून अशा प्रकरणासाठी किंवा प्रकरणांचा वर्ग किंवा गट यांसाठी वापरता येण्याजोग्या असतील अशा शक्ती, आणि विशेषत: व्यकिं्तना अटक करण्याच्या, त्यांच्या अन्वेषणांच्या किंवा कोणत्याही विशेष न्यायालयापुढे त्यांच्यावर खटला चालविण्याच्या शक्ती, प्रदान करु शकेल.
२)सर्व पोलीस अधिकारी आणि शासनाचे अधिकारी हा अधिनियम किंवा त्याखाली केलेला कोणताही नियम, योजना किंवा आदेश यांच्या उपबंधांच्या अंमलबजावणीसाठी पोटकलम (१) मध्ये निर्देशित केलेल्या अधिकाऱ्याला सहाय्य करतील.
३)संहितेचे उपबंध, होईल तेथवर, पोटकलम (१) खालील अधिकाऱ्याने करावयाच्या शक्तींच्या (अधिकारांच्या) वापरास लागू होतील.