अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
कलम ७ :
विवक्षित व्यक्तिच्या मालमत्तेचे समपहरण (सरकार जमा) :
१) या प्रकरणाअन्वये दंडनीय अशा कोणत्याही अपराधाबद्दल जेव्हा एखादी व्यक्ति सिद्धदोष ठरली असेल तेव्हा, विशेष न्यायालयाला, ठोठावण्यात येणाऱ्या शिक्षेबरोबरच, लेखी आदेशाद्वारो, घोषित करता येईल की, अशा व्यक्तिच्या मालकीची, जंगम वा स्थावर अथवा दोन्ही प्रकारची, जी कोणतीही मालमत्ता असा अपराध करण्यासाठी वापरण्यात आली असेल ती शासनाकडे समपऱ्हत (सरकार जमा) होईल.
२) या प्रकरणाखालील कोणत्याही अपराधाचा आरोप एखाद्या व्यक्तिवर ठेवण्यात आला असेल तेव्हा, तिची संपरीक्षा (विचारणा) करणाऱ्या विशेष न्यायालयाला असा आदेश देण्याची मुभा असेल की, तिच्या मालकीची जंगम वा स्थावर वा दोन्ही प्रकारची सर्व किंवा कोणतीही मालमत्ता अशा संपरीक्षेच्या (विचारण) कालावधीत जप्त करण्यात येईल आणि जेव्हा अशी संपरीक्षा दोषसिद्धीत परिणत होईल, तेव्हा अशा तऱ्हेने जप्त करण्यात आलेली मालमत्ता या प्रकरणान्वये ठोठावण्यात आलेल्या कोणत्याही द्रव्यदंडाच्या वसुलीसाठी आवश्यक असेल त्या मर्यादेपर्यंत समपऱ्हत केली जाण्यास पात्र असेल.