अनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९
प्रकरण २ :
अत्याचारांचे अपराध :
कलम ३ :
अत्याचाराच्या अपराधांसाठी शिक्षा :
१.(१)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजाती यांचा सदस्य नसलेली व्यक्ति जो कोणी –
(a) क)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही सदस्याच्या (व्यक्तिच्या)तोंडामध्ये कोणताही अखाद्य (खाण्यायोग्य नसलेला) किंवा घृणास्पद (किळसवाणा) पदार्थ घालेल किंवा अखाद्य किंवा घृणास्पद पदार्थ पिण्याची किंवा खाण्याची जबरदस्ती करील;
(b) ख)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही सदस्याच्या (व्यक्तिच्या) राहण्याच्या जागेमध्ये किंवा त्याच्या प्रवेशद्वाराजवळ विष्ठा, मैला(कचरा), जनावरांचे मृत शरीर किंवा इतर कोणताही घृणास्पद (किळसवाणा) पदार्थ टाकेल;
(c) ग)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) इजा होईल किंवा त्रास होईल या दृष्टीने त्याच्या शेजारी विष्ठा, टाकावू कचरा, जनावरांची मृत शरीरे किंवा इतर कोणताही किळस उत्पन्न करणारा पदार्थ टाकेल;
(d) घ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याच्या (व्यक्तिच्या) गळ्यात पादत्राणांची माळ घालेल किंवा नग्न अवस्थेत किंवा अर्धनग्न अवस्थेत धिंड काढेल;
(e) ङ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याच्या (व्यक्तिच्या) अंगावरील कपडे जबरदस्तीने काढेल, डोक्याची हजामत करेल, मिशा काढेल, चेहऱ्याला किंवा शरीराला रंग फासेल किंवा त्याप्रकारचे कृत्य करेल जे मानवी प्रतिष्ठेचा अवमान करणारे असेल;
(f) च)गैरमार्गाने अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याची (व्यक्तिची) कोणतीही जमीन ताब्यात घेईल किंवा त्यावर पिक घेईल किंवा कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने वाटून दिलेली किंवा अनुसूचित केलेली अशी कोणतीही जमीन हस्तांतरीत करील.
(g) छ)गैरमार्गाने अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) तीच्या जमिनीमधून हाकलून लावेल किंवा जागेमधून काढेल किंवा त्याच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ करेल, त्याच्या जमिनीमध्ये, जागेमध्ये किंवा पाणी किंवा कालव्यामधून केलेला पाणीपुरवठा किंवा पिकाची नासधूस करेल किंवा पिकविलेले धान्य काढून घेईल;
स्पष्टीकरण :
खंड (च) च्या गैरमार्गाने या व्याख्येमध्ये –
(A) (अ) व्यक्तिच्या इच्छेविरुद्ध;
(B) (आ)व्यक्तिच्या परवानगीशिवाय;
(C) (इ)व्यक्तिच्या इच्छेने, परंतू अशी इच्छा त्या व्यक्तिने मृत्युच्या किंवा जखमी होण्याच्या भीतीने दिलेली असेल; किंवा
(D) (ई)अशा जमिनीची कागदपत्रे बनावट पद्धतीने केलेली असतील;
(h) ज) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) भीक मागण्यास किंवा शासनाने सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्तीची केली असेल अशा कोणत्याही सेवे व्यतिरिक्त त्याच प्रकारची इतर जुलूम जबरदस्तीची व वेठबिगारीची कामे करण्यास भाग पाडील;
(i) झ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) मानवी मृत शरीर किंवा मृत जनावराचे शरीर वाहून नेण्यासाठी भाग पाडील, किंवा थडगी खोदण्यास भाग पाडील;
(j) ञ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) हाताने विष्ठा साफ करावयास लावील किंवा अशा कामावर ठेविल किंवा अशा कामासाठी नोकरीवर ठेवण्यास परवानगी देईल;
(k) ट)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रीला देवतेपुढे, पुतळ्यासमोर, ज्याची पूजा केली जाते अशा वस्तूसमोर, देऊळ किंवा इतर धार्मिक स्थळांसमोर देवदासी म्हणून खेळ करावयास भाग पाडील किंवा इतर कोणतीही त्यासारखी परंपरा करण्यास परवानगी देईल;
(l) ठ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) धमकावून, जबरदस्ती करुन किंवा धाकदपटशा करुन अडथळा उत्पन्न करुन-
(A) (अ)विशिष्ट उमेदवाराला मत न देण्यासाठी किंवा कायद्याने तरतूद केलेली असेल त्याखेरीज इतर प्रकारे मतदान करण्यासाठी भाग पाडील;
(B) (आ)उमेदवारा म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रतिबंध करील किंवा नामनिर्देशनपत्र परत घ्यायाला लावील;
(C) (इ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) कोणत्याही निवडणूकीत उमेदवार म्हणून नामनिर्देशनपत्राला अनुमोदन किंवा सुचविणे यांस प्रतिबंध करील;
(m) ड)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) जी संविधानाच्या भाग नऊ (९) अन्वये असलेल्या किंवा संविधानाच्या भाग नऊ-अ (९-ऐ) अन्वये नगरपालिकेचा अध्यक्ष किंवा इतर कोणताही कार्यालयातील कारभार पहाणारा असेल त्याला जबरदस्ती किंवा धाकदपटशा किंवा प्रतिबंध करुन त्याचे सामान्य कर्तव्य आणि कार्य करण्यास अडथळा निर्माण करील;
(n) ढ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) मतदान संपल्यानंतर जखमी होण्यास कारण होणे किंवा गंभीररीत्या जखमी करणे किंवा हल्ला करणे किंवा सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार किंवा त्याचा हक्क असलेला सार्वजनिक फायदा घेण्यास प्रतिबंध करील;
(o) ण)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याच्या (व्यक्तिच्या) विरुद्ध या अधिनियमात नमूद केलेला कोणताही अपराध विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास किंवा न देण्यास किंवा अधिनियमात कायद्याने तरतूद केलेली असेल असा केला असल्यास;
(p) त)जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्या (व्यक्तिच्या) विरुद्ध खोटा, दृष्ट किंवा तापदायक दावा दाखल करणे अथवा फौजदारी किंवा कायद्याची इतर कार्यवाही सुरु करणे;
(q) थ)कोणत्याही लोकसेवकास खोटी किंवा खोडसाळ माहिती पुरविणे व त्यायोगे अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या व्यक्तिस इजा किंवा त्रास होईल अशा प्रकारे आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करण्यास त्या लोकसेवकास उद्युक्त करील;
(r) द)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याचा (व्यक्तिचा) पाणउतारा करण्याच्या उद्देशाने सर्व लोकांना दिसेल अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी तिचा हेतुपुरस्सर अपमान करील किंवा तिला धाकदपटशा दाखविल;
(s) ध)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) तिच्या जातीच्या नावाने सर्व लोकांसमोर अपशब्द बोलील;
(t) न)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यांना (व्यक्तिंना) पवित्र असणाऱ्या वस्तू नष्ट करील, नासधूस करील किंवा घाण करील;
स्पष्टीकरण :
वरील खंडातील वस्तू या व्याख्येचा अर्थामध्ये पुतळा, मूर्ती आणि प्रतिमा याचा समावेश होतो;
(u) प)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्या (व्यक्ति) विरुद्ध लेखी किंवा मौखिक किंवा खुणांनी किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधिद्वारे किंवा इतर प्रकारे शत्रुत्वाची भावना, द्वेष किंवा वाईट इच्छा व्यक्त करील;
(v) फ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यामध्ये (व्यक्तिमध्ये) ज्याच्याविषयी नितांत आदर आहे अशा मृत व्यक्तिचा अपमान किंवा अनादर लेखी किंवा तोंडी करील;
(w) ब)(एक) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रीला ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे याची माहिती असताना तिला जाणूनबुजून तिची संमती नसताना स्पर्श करील;
(दोन)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रीला लैगिक पद्धतीचे हावभाव करील, अपशब्द वापरील, वाईट कृती करील या गोष्टी ती स्त्री अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे याची कल्पना असताना करील;
स्पष्टीकरण :
उपखंड (एक) मधील संमती या संज्ञेचा अर्थ संशयास्पद आपखुशीने तयार असणारी, जेव्हा व्यक्ती हावभावाने किंवा इतर कोणत्याही शाब्दिक संभाषणाव्यतिरिक्त विशिष्ट कृती करण्यासाठी संमतीसाठी निरोप देणे असा होतो:
परंतु असे की, अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची स्त्री लैंगिक कोणत्याही कृत्याला प्रतिकार करीत नाही याचा अर्थ असा होत नाही की, तिची लैंगिक कृत्याला संमती आहे.
परंतु आणखी असे की, स्त्रीचा लैंगिक इतिहास यामध्ये अतिचारी तिची संमती आहे असे लादू शकत नाही किंवा त्यामुळे अपराधाचा गंभीरपणा कमी होतो असे नाही;
(x) भ)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्य (व्यक्ति) सर्वसामान्यपणे ज्या कोणत्याही झऱ्याचे, जलाशयाचे किंवा कोणत्याही इतर स्त्रोतापासून मिळणारे पाणी वापरत असतील त्या पाण्यात सर्वसाधारणपणे ज्या प्रयोजनासाठी त्याचा वापर होत असेल त्यासाठी ते अयोग्य व्हावे अशाप्रकारे ते पाणी दुषित किंवा घाण करील;
(y) म)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा कोणताही रुढी प्राप्त अधिकार नाकारणे किंवा अन्य जनतेला अथवा त्या जनतेच्या कोणत्याही भागाला ज्याचा वापर करण्याचा किंवा जेथे जाण्याचा हक्क असेल अशा सार्वजनिक राबत्याचा (वहीवाट) ठिकाणाचा वापर करण्यास किंवा तेथे जाण्यास अशा व्यक्तिला प्रतिबंध करण्यासाठी अडथळा आणिल;
(z) य)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्यास (व्यक्तिस) तिचे घर, गाव किंवा अन्य निवासस्थान सोडण्यास भाग पाडिल किंवा तसे करण्यास कारणीभूत होईल :
परंतु, लोक कर्तव्य पार पाडताना केलेल्या कोणत्याही कृतीला या खंडातील काहीही लागू होणार नाही.
यक)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) कोणत्याही प्रकारे प्रतिबंध किंवा अडथळा उत्पन्न करील-
(A) (अ)सार्वजनिक मालमत्तेमधील साधने किंवा पुरण्याची जागा किंवा इतरांबरोबर वापरले जाणारे स्मशान किंवा कोणतेही नदी, झरे, ओहोळ, विहीर, तलाव, पाण्याची,नळाचे पाणी किंवा इतर पाण्याचे स्त्रोत किंवा कोणतेही आंघोळीचे घाट कोणतेही सार्वजनिक वहाने, कोणताही रस्ता किंवा मार्ग;
(B) (आ)सायकलवर बसणे किंवा चालविणे किंवा मोटार सायकल किंवा पादत्राणे वापरणे किंवा सार्वजनिक ठिकाणी नवीन कपडे घालणे किंवा लग्नाची मिरवणूक काढणे किंवा घोड्यावर बसणे किंवा लग्नाच्या मिरवणूकीमध्ये कोणत्याही वाहनामध्ये बसणे;
(C) (इ)सार्वजनिक जनतेला खुले असणाऱ्या कोणत्याही पवित्र स्थानामध्ये प्रवेश करणे किंवा इतर व्यक्तिप्रमाणे धर्माचे पालन करणे किंवा कोणतीही धार्मिक, सांस्कृतिक किंवा समाजातील मिरवणूकीमध्ये भाग घेणे किंवा काढणे यामध्ये जत्रेचा सुद्धा समावेश होतो;
(D) (ई)कोणत्याही शैक्षणिक संस्थामध्ये, रुग्णालय, दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, दुकान किंवा सार्वजनिक करमणुकिचे ठिकाण किंवा इतर कोणतेही सार्वजनिक ठिकाण, किंवा सार्वजनिक उपयोगी असलेली कोणतीही भांडी जी सर्वांसाठी उपयोगी आहेत अशी; किंवा
(E) (उ)कोणताही व्यवसाय करणे किंवा धंदा चालू करणे, व्यापार किंवा धंदा किंवा कोणत्याही ठिकाणी इतर सार्वजनिक लोकांसाठी असते अशी नोकरी किंवा कोणत्याही भागासाठी वहिवाटीचा हक्क;
(zb) यख)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या सदस्याला (व्यक्तिला) ती व्यक्ति जादूटोणा करते किंवा मांत्रिक आहे या कारणासाठी शारीरिक दुखापत किंवा मानसिक यातना देणे; किंवा
(zc) यग)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या कोणत्याही सदस्याला (व्यक्तिला) किंवा कुटुंबाला सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार टाकण्याची धमकी देईल किंवा टाकील;
तो सहा महिन्यापेक्षा कमी नाही अशा कारावासाची शिक्षा परंतु ती पाचवर्षापर्यंत वाढविता येईल आणि द्रव्यदंडास ही पात्र असेल.)
२)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीचा नसेल अशा कोणत्याही व्यक्तिने-
एक)ज्यामुळे अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे देहान्तदंड असलेल्या एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष ठरण्याची शक्यता आहे हे माहित असताना, खोटा पुरावा देईल किंवा तयार करील त्याला जन्मठेपेची व द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल; आणि अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा एखादा निरपराध सदस्य अशा खोट्या किंवा तयार केलेल्या खोट्या पुराव्यामुळे सिद्धदोष ठरविण्यात आला आणि त्याला फाशी देण्यात आली तर, ज्या व्यक्तिने असा खोटा पुरावा दिला किंवा तयार केला असेल तिला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल;
दोन)ज्यामुळे अनूसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा कोणताही सदस्य देहान्तदंड नव्हे पण ज्यासाठी सात वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते अशा एखाद्या अपराधाबद्दल सिद्धदोष ठरावा या हेतूने किंवा तो सिद्धदोष ठरण्याची शक्यता आहे हे माहित असताना खोटा पूरावा देईल किंवा तयार करील त्याला सहा महिन्यांहून कमी नाही परंतु जी सात किंवा अधिक वर्षापर्यंत वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल;
तीन)अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या एखाद्या सदस्याच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने कंवा त्यायोगे असे नुकसान होईल अशी शक्यता आहे, हे माहीत असताना, तिला आग लावून किंवा कोणत्याही स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक करील त्यास सहा महिन्यापेक्षा कमी असणार नाही परंतु जी सात वर्षापर्यंत वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल;
चार)अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा एखादा सदस्य सर्वसाधारणत: प्रार्थनास्थळ म्हणून किंवा मानवी वसतिस्थान म्हणून किंवा आपल्या मालमत्तेच्या अभिरक्षेचे ठिकाण म्हणून जिचा वापर करीत असेल अशा कोणत्याही इमारतीचे नुकसान करण्याच्या उद्येशाने किंवा तिचे नुकसान होण्याची शक्यता आहे हे माहित असताना, आग लावून किंवा एखाद्या स्फोटक पदार्थाद्वारे आगळिक करील त्याला जन्मठेपेची व द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल;
पाच) २.(एखादी व्यक्ति अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जनजातीचा सदस्य आहे हे माहीत असून, याच कारणावरुन त्या व्यक्तिविरुद्ध किंवा एखादी मालमत्ता अशा एखाद्या सदस्याची आहे) या कारणावरुन त्या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंड संहितेद्वारे (१८६० चा ४५) ज्यासाठी दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येते असा कोणताही अपराध करील त्याला आजीवन कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा देण्यात येईल;
३.(पाच-क)एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जनजातीची आहे किंवा अशी मालमत्ता अशा व्यक्तिची किंवा सदस्याची आहे हे माहित असून अनुसूचित विर्निर्दिष्ट केलेला अपराध केला असल्यास अशा अपराधाबद्दल भारतीय दंड संहिता १८६० (१८६० चा ४५) अन्वये शिक्षेस पात्र ठरेल आणि द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल;)
सहा)या प्रकरणाखालील अ्रपराध करण्यात आला आहे हे माहीत असताना किंवा तसे वाटण्यास कारण असताना, वैध शिक्षेपासून अपराध्याला वाचवण्याच्या हेतूने, तो अपराध केल्याचा कोणत्याही पुरावा नाहीसा करील अथवा त्या उद्देशाने, त्या अपराधासंबंधात जी खोटी आहे हे त्याला ठाऊक आहे किंवा ती खोटी आहे असे त्याला वाटते अशी कोणतीही माहिती देईल त्याला त्या अपराधासाठी उपबंधित केलेली शिक्षा देण्यात येईल; किंवा
सात)लोकसेवक असताना, या कलमाखालील कोणताही अपराध करील त्याला एक वर्षाहून कमी नाही इतकी, परंतु त्या अपराधासाठी उपबंधित केलेल्या शिक्षेच्या मुदतीइतकी वाढवता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल.
———-
१. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ४ अन्वये पोटकलम (१) ऐवजी समाविष्ट करण्यात आले. (२६-१-२०१६ पासून)
२. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले. (२६-१-२०१६ पासून)
३. २०१६ चा अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.