महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम ३७ :
केंद्र शासनाचे नियम करण्याचे अधिकार :
(१) केंद्र शासनाला या अधिनियमाच्या तरतुदी पार पाडण्यासाठी अधिसूचनेद्वारे, नियम करता येतील.
(२) विशेषत: आणि पूर्वगामी अधिकाराच्या सर्वसाधारणतेला बाध न येता असे नियम पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबींसाठी तरतूद करू शकतील.
(a)(क)(अ) कलम ८ च्या पोटकलम (२) खालील संरक्षण अधिकारी ज्या अर्हता आणि जो अनुभव धारण करील तो;
(b)(ख)(ब) कलम ८ च्या पोटकलम (३) खालील संरक्षण अधिकारी आणि त्याला दुय्यम असणारे इतर अधिकारी याच्या सेवेच्या अटी व शर्ती;
(c)(ग) (क) कलम ९ च्या पोटकलम (१) च्या खंड (ब) खालील कौटुंबिक घटनेचा अहवाला ज्या नमुन्यात व ज्या रीतीने द्यावयाचा तो नमुना व ती रीत;
(d)(घ)(ड) कलम ९ च्या पोटकलम (१) च्या खंड (क) खालील दंडाधिकाऱ्याने काढावयाच्या संरक्षण आदेशासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना आणि रीत;
(e)(ङ)(इ) कलम ९, पोटकलम (१) च्या खंड (ड) अन्वये दाखल करावयाच्या तक्रारीचा नमुना;
(f)(च)(फ) कलम९, पोटकलम (१) च्या खंड (आय) खालील संरक्षण अधिकाऱ्याने पालन करावयाची इतर कर्तव्ये;
(g)(छ)(ग) कलम १० च्या पोटकलम (१) खालील सेवा पुरविणाऱ्यांच्या नोंदणीचे विनियमन करणारे नियम;
(h)(ज)(ह) या अधिनियमाखालील साहाय्य मागण्यासाठी कलम १२ च्या पोटकलम (१) खालील अर्जाचा नमुना आणि त्या कलमाच्या पोटकलम (३) मध्ये अंतर्भूत असलेले अशा अर्जातील तपशील;
(i)(झ)(आय) कलम १३ च्या पोटकलम (१) खालील नोटिसा बजावण्याची साधने;
(j)(ञ)(जे) कलम १३ च्या पोटकलम (२) खालील संरक्षण अधिकाऱ्याने करावयाच्या नोटीस बजावणीच्या घोषणेचा नमुना;
(k)(ट) (के) कलम १४ च्या पोटकलम (१) खालील, सेवा पुरविणाऱ्याच्या सदस्याने धारण करावयाच्या पात्रता आणि समुपदेशनातील अनुभव;
(l)(ठ)(ल) कलम २३ च्या पोटकलम (२) खाली, बाधित व्यक्तीने दाखल करावयाच्या शपथपत्राचा नमुना;
(m)(ड)(म) विहित करावयाच्या किंवा करता येतील अशा इतर कोणत्याही बाबी;
(३) या अधिनियमाखाली करावयाचा प्रत्येक नियम तो करण्यात आल्यावर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे, ती सत्रासीन असताना, एका सत्रात किंवा दोन किंवा अधिक लागोपाठची सत्रे मिळून एकूण तीस दिवसांच्या कालावधीसाठी मांडण्यात येईल आणि जर लगतनंतरचे सत्र किंवा पूर्वोक्तप्रमाणे लागोपाठची सत्रे समाप्त होण्यापूर्वी दोन्ही सभागृहे नियमात कोणतीही फेरबदल करण्यास किंवा नियम करण्यात येऊ नये यासाठी सहमत होतील तर, ते नियम त्यानंतर अशा सुधारित स्वरूपातच अमलात येतील किंवा यथास्थिती, अमलात येणार नाहीत, मात्र असा फेरबदल किंवा समाप्ती ही त्या नियमांन्वये पूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या वैधतेस बाध येऊ देणार नाही.