महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम १० :
सेवा पुरविणारे :
(१) याबाबतीत करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून, जिची नोंदणी, सोसायटी नोंदणी अधिनियम, १८६० (१८६० चा२१) अन्वये झाली आहे अशी सोसायटी किंवा कंपनी अधिनियम, १९५६ (१९५६ चा १) याअन्वये किंवा महिलांना कायदेविषयक साहाय्य, वैद्यकीय, आर्थिक किंवा इतर साहाय्य पुरविणे व कोणत्याही कायदेशीर मार्गाने त्यांच्या हक्कांचे व हितसंबंधाचे संरक्षण करणे या उद्देशाच्या त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये नोंदणी करण्यात आलेली कंपनी, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी सेवा पुरविणारी म्हणून स्वत:ची राज्य शासनाकडे नोंदणी करू शकेल.
(२) पोटकलम (१) अन्वये नोंदणी करण्यात आलेल्या सेवा पुरविण्याऱ्याला पुढील अधिकार असतील, –
(a)क)(अ) बाधित व्यक्तीची तशी इच्छा असेल तर, कौटुंबिक घटनेचा अहवाल विहित नमुन्यात अभिलिखित करणे आणि ज्याच्या अधिकार क्षेत्रात कौटुंबिक हिंसाचार घडला असेल त्या दंडाधिकाऱ्याकडे आणि संरक्षण अधिकाऱ्याकडे त्याची प्रत पाठवणे;
(b)ख)(ब) बाधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करवून घेणे आणि ज्याच्या अधिकार क्षेत्राच्या स्थानिक सीमांच्या आत कौटुंबिक हिंसाचार घडला असेल त्या संरक्षण अधिकाऱ्याकडे आणि पोलीस ठाण्याकडे तो पाठवणे;
(c)ग) (क) बाधित व्यक्तीची तशी गरज असेल तर, तिला आश्रयगृहात आसरा पुरविण्यात आला असल्याची खात्री करून घेईल आणि बाधित व्यक्तीची आश्रयगृहात निवासव्यवस्था केल्याचा अहवाल, ज्या पोलीस ठाण्याला स्थानिक हद्दीमध्ये कौटुंबिक हिंसाचार घडला असेल, त्या पोलीस ठाण्याकडे पाठवील.
(३) कोणताही सेवा पुरविणारा किंवा सेवा पुरविणारा कोणताही सदस्य, या अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करताना किंवा कर्तव्ये पार पाडताना, सद्हेतूने केलेली असेल किंवा तसे करण्याचा उद्देश असेल अशी, या अधिनियमाखालील कृती किंवा अधिनियमाखालील कृती असल्याचे अभिप्रेत असलेली कृती, करील किंवा तशी ती केली असल्याचे मानण्यात येईल त्यासाठी, त्याच्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकणार नाही.