Posh act 2013
कलम १३ :
चौकशीचा अहवाल :
(१) या अधिनियमाखालील चौकशी पूर्ण झाल्यावर अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, चौकशी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून दहा दिवसांच्या आत, तिच्या निष्कर्षाचा अहवाल मालकास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास सादर करील आणि असा अहवाल संबंधित पक्षकारांना उपलब्ध करून देईल.
(२) जेव्हा अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती उत्तरवादीविरूद्धचे आरोप सिद्ध झालेले नाही अशा निष्कर्षाप्रत आली असेल तेव्हा, ती मालकास व जिल्हा अधिकाऱ्यास या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही अशी शिफारस करील.
(३) जेव्हा अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती उत्तरवादीविरूद्धचा आरोप सिद्ध झाले आहे अशा निष्कर्षाप्रत येईल तेव्हा ती नियोक्त्यास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास अशी शिफारस करील की, –
(एक) लैंगिक छळवणुकीसाठी उत्तरवादीस लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार गैरवर्तणूक म्हणून कारवाई करावी किंवा जेव्हा असे सेवानियम केलेले नसतील तेव्हा, विहित करण्यात येईल अशा रीतीने कारवाई करावी;
(दोन) उत्तरवादीस लागू असलेल्या सेवा नियमांमध्ये काहीही असले तरी, कलम १५ च्या तरतुदींनुसार निर्धारित करण्यात येईल त्याप्रमाणे पीडित महिलेस किंवा तिच्या कायदेशीर वारसांना प्रदान करावयाची तिला योग्य वाटेल अशी रक्कम उत्तरवादीच्या वेतनातून किंवा मजुरीतून वजा करावी :
परंतु, मालक कर्तव्यावरील त्याच्या अनुपस्थितीमुळे किंवा नोकरी समाप्त झाल्यामुळे, उत्तरवादीच्या वेतनातून अशी रक्कम वजा करण्यास असमर्थ असेल तर, तो अशी रक्कम पीहित महिलेस प्रदान करण्यासाठी उत्तरवादीस आदेश देऊ शकेल :
परंतु, आणखी असे की, जर उत्तरवादीने, खंड (दोन) मध्ये निर्दिष्ट केलेली रक्कम प्रदान करण्यास कसूर केली असेल तर, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, जमीन महसूलाची थकबाकी असल्याप्रमाणे रक्कम वसूल करण्याकरिता आदेश, संबंधित जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवील.
(४) मालक किंवा जिल्हा अधिकारी, त्यांना शिफारशी मिळाल्यापासून साठ दिवसांच्या आत शिफारशीवर कृती करील.