लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण ६ :
बालकाचा जबाब नोंदवून घेण्याची कार्यपद्धती :
कलम २४ :
बालकाचा जबाब नोंदवून घेणे :
१) बालकाचा जबाब, बालकाच्या घरी किंवा जेथे तो नेहमी राहत असेल त्या ठिकाणी किंवा त्याच्या पसंतीच्या ठिकाणी आणि शक्य असेल तेथवर उपनिरीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसेल अशा महिला पोलीस अधिकाऱ्याकडून नोंदवून घेण्यात येईल.
२) बालाकाचा जबाब नोंदवून घेतेवेळी पोलीस अधिकारी गणवेशात नसेल.
३) अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी बालकाची तपासणी कोणत्याही वेळी करताना बालकाचा आरोपीशी कोणत्याही प्रकारे संपर्क येणार नाही याची खात्री करून घेईल.
४) कोणत्याही बालकाला, कोणत्याही कारणामुळे पोलीस ठाण्यात रात्री थांबवून ठेवता येणार नाही.
५) पोलीस अधिकारी, बालकाच्या हिताच्या दृष्टीने विशेष न्यायालयाने अन्यथा निदेश दिल्याखेरीज बालकाच्या ओळखीला सार्वजनिक प्रसार माध्यमापासून संरक्षण दिले असल्याची खातरजमा करील.