Site icon Ajinkya Innovations

Phra 1993 कलम १२ : आयोगाची कार्ये :

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३
प्रकरण ३ :
आयोगाची कार्ये आणि अधिकार :
कलम १२ :
आयोगाची कार्ये :
आयोग पुढीलपैकी सर्व किंवा काही कार्ये पार पाडील :-
(a)क)(अ) खालील तक्रारींमध्ये स्वत:हून, किंवा बळी ठरलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीने, १.(किंवा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय च्या निर्देशानुसार) विनंतीअर्ज केल्यावरुन, चौकशी करील :-
एक) मानवी हक्कांचा भंग किंवा त्यास प्रोत्साहन, किंवा
दोन) अशा हक्कभंगास प्रतिबंध करण्यास लोक सेवकांकडून झालेला निष्काळजीपणा.
(b)ख)(ब) मानवी हक्कांचा भंग झाल्याचा आरोप असलेल्या व कोणत्याही न्यायालयात प्रलंबित असलेल्या कार्यवाहीत त्या न्यायालयाच्या संमतीने हस्तक्षेप करील;
(c)२.(ग)(क) त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याद काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या कोणत्याही तुरुंगात किंवा अन्य एखाद्या संस्थेत उपचाराच्या, सुधारण्याच्या, किंवा सुरक्षिततेच्या प्रयोजनार्थ व्यक्तीस स्थानबद्ध केलेले किंवा ठेऊन घेण्यात आलेले असेल त्या तुरुंगाला वा संस्थेला, त्या निवासी व्यक्तींच्या जीवन परिस्थितीचा अभ्यास करुन त्यावर शिफारशी देण्यासाठी, राज्य शासनास सूचना देऊन भेट देईल.)
(d)घ)(ड) संविधानाद्वारे किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी पुरविण्यात आलेल्या संरक्षक उपायांचा आढावा घेईल व त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शिफारशी करील;
(e)ङ) (इ) मानवी हक्काच्या वापरात विघ्न आणणाऱ्या घटकांचे, मग ज्यात दहशतवादी कृत्यांचाही समावेश आहे, पुनर्विलोकन करुन त्यावर उचित उपाययोजनांची शिफारस करील;
(f)च)(फ) मानवी हक्कांबाबतचे तह व इतर आंतरराष्ट्रीय संलेख यांचा अभ्यास करील आणि त्यांच्या परिणामकारक कार्यान्वयनासाठी शिफारस करील;
(g)छ)(ग) मानवी हक्कांच्या क्षेत्रात संशोधन कार्य हाती घेईल व त्यास चालना देईल;
(h)ज)(ह) मानवी हक्कांबाबतची जाण समाजाच्या विविध वर्गात निर्माण करील आणि प्रकाशने, प्रसार माध्यमे, चर्चासत्रे व इतर उपलब्ध साधने यांद्वारे या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संरक्षक उपाययोजनांची जास्तीत जास्त माहिती करुन देईल;
(i)झ)(आय) अशासकीय संघटना आणि संस्था यांच्या मानवी हक्कांच्या क्षेत्रातील प्रयत्नांना उत्तेजन देईल;
(j)ञ)(जे) मानवी हक्कांच्य प्रचालनासाठी आवश्यक वाटतील अशी इतर कार्ये करील.
———
१. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २००६ चा अधिनियम क्रमांक ४३ याच्या कलम ९ अन्वये मूळ खंडाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Exit mobile version