नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १४:
कंपन्यांनी केलेले अपराध :
(१) या अधिनियमाखालील अपराध करणारी व्यक्ती ही कंपनी असेल तर, अपराध घडला त्या वेळी कंपनीच्या कामकाजचलनाचा प्रभार जिच्यावर असेल किंवा त्याबद्दल कंपनीला जी जबाबदारी असेल ती प्रत्येक व्यक्ती, या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि तिच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास आणि तदनुसार शिक्षा मिळण्यास ती पात्र असेल:-
परंतु, अपराध आपल्या नकळत करण्यात आला होता किंवा असा अपराध घडू नये म्हणून आपण सर्व प्रकारे वाजवी तत्परता दाखविली होती असे जर त्या व्यक्तीने शाबीत केले तर, या पोट कलमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे ती कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही.
(२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाखालील अपराध हा कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी याच्या संमतीने करण्यात आला असेल तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी अशा अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास व तदनुसार शिक्षा मिळण्यास तो पात्र असेल.
स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयाजनार्थ,-
(a)(क) (अ) कंपनी याचा अर्थ, कोणताही निगम-निकाय असा आहे आणि त्यात पेढीचा किंवा अन्य व्यक्तिसंघाचा समावेश आहे, आणि
(b)(ख) (ब) संचालक याचा पेढीच्या संबंधातील अर्थ, पेढीतील भागीदार, असा आहे.
