नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम १:
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
(१९५५ चा अधिनियम क्रमांक २२)
१.(अस्पृश्यते विषयी जाहीर शिकवण देणे व ती पाळणे) या बद्दल, त्यातून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादण्याबद्दल आणि त्याच्याशी निगडित असलेल्या बाबींबद्दल शिक्षा विहित करण्यासाठी अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या सहाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
———
(१) या अधिनियमास २.(नागरी हक्क संरक्षण अधिनियम), १९५५ असे म्हणता येईल.
(२) त्याचा ३.(विस्तार) संपूर्ण भारतावर आहे.
(३) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करीत अशा ४.(दिनांकास) तो अमलात येईल.
———
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम २ अन्वये अस्पृश्यता पाळणे याऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ३ अन्वये अस्पृश्यता (अपराध) अधिनियम याऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९६२ चा विनियम १२ याच्या कलम ३ आणि अनुसूची अन्वये काही फेरफारांसह गोवा, दमण आणि दीव यावर आणि १९६३ चा विनियम ६ याच्या कलम २ आणि अनुसूची १ या अन्वये दादरा आणि नगरहवेलीवर (१-७-१९६५ पासून) आणि १९६३ चा विनियम ७ याच्या कलम ३ आणि अनुसूची १ या अन्वये पाँडिचेरीवर (१-१०-१९६३ पासून) विस्तारित करण्यात आला.
४. १ जून १९५५, पहा – अधिसूचना क्रमांक एसआरओ- ११०९, दिनांक २३ मे १९५५, गॅझेट ऑफ इंडिया १९५५, असाधारण भाग दोन विभाग तीन पृष्ठ १९७१.