Site icon Ajinkya Innovations

Pcpndt act कलम २ : व्याख्या :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्य अर्थ, अपेक्षित नसेल तर,-
(a)क) समुचित प्राधिकरण याचा अर्थ, कलम १७ अन्वये नियुक्त केलेले समुचित प्राधिकरण, असा आहे;
(b)ख) मंडळ याचा अर्थ, कलम ७ अन्वये घटित केलेले केंद्रीय पर्यवक्षी मंडळ, असा आहे;
(ba)१.(खक) गर्भधारित याचा अर्थ, भ्रूणाचे बाह्यपटल तसेच भू्रण व गर्भ यांसह फलनक्रियेपासून जन्मापर्यंतच्या विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर असलेली गर्भधारणेची कोणतीही निर्मिती, असा आहे;
(bb)(खख) भू्रण याचा अर्थ, फलनानंतर आठ आठवडे (छप्पन दिवस) संपेपर्यंत विकसित होत जाणारा मानवी जीव, असा आहे;
(bc)(खग) गर्भ याचा अर्थ, फलनानंतर किंवा निर्मितीनंतर सत्तावन्नाव्या दिवसापासून सुरु होऊन जन्माच्या वेळी संपणाऱ्या विकासाच्या कालावधीतील (विकास खुंटला असेल तो कालावधी वगळून ) मानवी जीव, असा आहे;)
(c)ग) आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र याचा अर्थ, रुग्णांना जेथे प्रजननविषयक सल्ला दिला जातो अशी संस्था, रुग्णालय, शुश्रूषालय किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारे अन्य ठिकाण, असा आहे;
(d)घ) आनुवंशिकीय चिकित्सालय याचा अर्थ, प्रसव-पूर्व रोगनिदान प्रक्रिया करण्यासाठी ज्याचा वापर केला जातो असे चिकित्सालय, संस्था, रुग्णालय, शुश्रूषालय किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधण्यात येणारे कोणतेही ठिकार, असा आहे;
२.(स्पष्टीकरण :
या खंडाच्या प्रयोजनाकरिता, आनुवंशिकीय चिकित्सालय या मध्ये, स्वनातीत यत्र किंवा प्रतिमादर्शक यंत्र किंवा क्रमवीक्षक किंवा गर्भधारणापूर्व लिंग निवड करण्याची क्षमता असणारे हातवाही उपकरण जेथे वापरण्यात येत असे वाहन, याचा समावेश होतो;)
(e)ङ) आनुवंशिकीय प्रयोगशाळा याचा अर्थ, प्रयोगशाळा, असा आहे आणि त्यामध्ये प्रसव-पूर्व रोगनिदान चाचणीसाठी आनुवंशिकीय चिकित्सालयाकडून प्राप्त झालेल्या नमुन्यांचे विश्लेषण किंवा चाचण्या करण्याची सुविदा परुविण्यात येत असेल अशा जागेचा समावेश होतो;
१.(स्पष्टीकरण :
या खंडाच्या प्रयोजनाकरिता, आनुवंशिकीय प्रयोगशाळा यामध्ये, स्वनातीत यंत्र किंवा प्रतिमादर्शक यंत्र किंवा क्रमवीक्षक किंवा गर्भाचे लिंक निर्धारित करणारे अन्य उपकरण किंवा गर्भार अवस्थेत लिंग ओळखण्याची किंवा गर्भधारणापूर्व लिंग निवड करण्याची क्षमता असणारे हातवाही उपकरण जेथे वापरण्यात येते अशा जागेचा समावेश होता;)
(f)च) स्त्रीरोगतज्ञ याचा अर्थ, स्त्रीरोगशास्त्र व प्रसूतिशास्त्र या विषयातील पदव्युत्तर अर्हता प्राप्त केलेली व्यक्ती, असा आहे;
(g)२.(छ) वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ यामध्ये लिंग निवड व प्रवस-पूर्व रोगनिदान तंत्रे या क्षेत्रामधील प्रजननशास्त्र या विषयातील पदवी किंवा पदविका धारण करणाऱ्या किंवा पुढील अर्हता प्राप्त केल्यानंतर अशा क्षेत्रामधील दोन वर्षापेक्षा कमी नसेल एवढ्या कालावधीचा अनुभव असलेल्या व्यक्तीचा समावेश होतो, –
एक) भारतीय वैद्यक परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) अन्वये मान्यताप्राप्त असलेल्या वैद्यकीय अर्हतापैकी कोणतीही एक अर्हता ; किंवा
दोन) जीवविज्ञानातील पदव्युत्तर पदवी;)
(h)ज) बालरोगचिकित्सक याचा अर्थ, बालरोगचिकित्सा शास्त्रातील पदव्युत्तर अर्हता धारण करणारी व्यक्ती, असा आहे;
(i)३.(झ) प्रसव-पूर्व रोगनिदान प्रक्रिया याचा अर्थ, गर्भधारणेपूर्वी किंवा त्यानंतर, लिंग निवडीकरिता कोणत्याही प्रकारचे विश्लेषण करण्यासांठी किंवा प्रसव-पूर्व रोगनिदान चाचण्या करण्यासाठी स्वनातीत – चित्रण ( अल्ट्रासोनाग्राफी) करणे, गर्भ प्रतिमा-दर्शन (फोटोस्कोपी) करणे, आनुवंशिकीय प्रयोगशाळेकडे किंवा आनुवंशिकीय चिकित्सालयाकडे पाठविण्यासाठी गर्भजलाचे, जरायु उद्वर्धाचे (कोरियोनिक व्हिलाय), भ्रूणाचे, पुरुषाच्या किंवा गर्भधारणेपूर्वी वा नंतर स्त्रीच्या रक्ताचे किंवा इतर कोणत्याही ऊतीचे किंवा स्त्रावाचे नमुणे घेणे किंवा ते काढणे यांसारखी संपूर्ण स्त्रीरोगशास्त्रीय किंवा प्रासविक किंवा वैद्यकीय प्रक्रिया असा आहे;)
(j)ञ) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे यांमध्ये, सर्व प्रसव-पूर्व रोगनिदान प्रक्रिया व प्रसव-पूर्व रोगनिदान चाचण्या यांचा समावेश होतो;
(k)४.(ट) प्रसव-पूर्व रोगनिदान चाचणी याचा अर्थ, प्रजननदोष किंवा चयापचय दोष अथवा लिंगगुणसूत्रविषयक अपसामन्यता किंवा जन्मजात विसंगती किंवा हिमोग्लोबीन विकृती किंवा लिंगसंलग्न रोग शोधून काढण्यासाठी गर्भवती स्त्रीचे किंवा गर्भाचे केलेले स्वनातीत-चित्रण किंवा तिचे गर्भजल, जरायु उद्वर्ध, रक्त किंवा कोणतीही ऊती किंवा स्त्राव यांची केलेली कोणतीही चाचणी किंवा विश्लेषण, असा आहे;)
(l)ठ) विहित याचा अर्थ, या अधिनियमाअन्वये करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे;
(m)ड) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी याचा अर्थ, भारतीय वैद्यक परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) याच्या कलम (२) च्या खंड (ज) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय अर्हता धारण करणारा आणि राज्य वैद्यक नोंदवहीत ज्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे असा, वैद्यक व्यवसायी, असा आहे;
(n)ढ) विनियम याचा अर्थ, या अधिनियमान्वये, मंडळाने केलेले विनियम, असा आहे;
(o)५.(ण) लिंग निवड यामध्ये, भ्रूण हे विशिष्ट लिंगाचे असणे सुनिश्चित करण्याच्या आणि तसे बनण्याची संभाव्यता वाढवण्याच्या प्रयोजनार्थ, करण्यात आलेली कोणतीही प्रक्रिया, तंत्र, चाचणी किंवा औषधयोजना किंवा औषधपत्र किंवा त्यासाठी केलेली कशाचीही तरतूद, यांचा समावेश हातो;
(p)त) स्वनातीत चित्रण प्रतिमा दर्शक तंत्र याचा अर्थ, भारतीय वैद्यक परिषद अधिनियम, १९५६ (१९५६ चा १०२) या अन्वये, मान्यताप्राप्त असलेल्या वैद्यकीय अर्हतांपैकी कोणतीही एक अर्हता धारण करणारी व्यक्ती किंवा स्वनातीत चित्रण किंवा प्रतिमा दर्शक तंत्रे किंवा क्ष-किरण-शास्त्र यातील पदव्युत्तर अर्हता धारण करणारी व्यक्ती असा आहे;
(q)थ) राज्य मंडळ याचा अर्थ, कलम १६क अन्वये घटित करण्यात आलेले राज्य पर्यवेक्षी मंडळ किवा संघ राज्यक्षेत्र पर्यवेक्षी मंडळ, असा आहे;
(r)द) विधानमंडळ असलेल्या संघ राज्यक्षेत्राच्या संबंधात राज्य शासन याचा अर्थ, संविधानाच्या अनुच्छेद २३९ अन्वये, राष्ट्रपतीने नियुक्त केलेला त्या संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक, असा आहे.)
——–
१.सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ४ द्वारे समाविष्ट करण्यात आला (१४ फेबु्रवारी २००३ रोजी व तेव्हापासून).
२.सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ४ द्वारे , मूळ खंड (छ) ऐवजी हा खंड दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)
३.सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ४ द्वारे , मूळ खंड (झ) ऐवजी हा खंड दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)
४.सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ४ द्वारे , मूळ खंड (ट) ऐवजी हा खंड दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)
५.सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ४ द्वारे , हे खंड दाखल करण्यात आले (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)

Exit mobile version