गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
प्रकरण ७ :
अपराध व शास्ती :
कलम २२ :
१.(गर्भधारणापूर्व व प्रसव-पूर्व लिंग निर्धारणाच्या संबंधात जाहिरात करण्यास मनाई आणि त्याचे उल्लंघन करण्यासाठी शिक्षा :
१) गर्भ लिंग निर्धारणासाठी किंवा लिंग निवडीसाठी वापरण्यात येणारे स्वनातीत यंत्र किंवा प्रतिमादर्शक यंत्र किंवा क्रमवीक्षक किंवा अन्य कोणतेही तंत्रज्ञान जवळ बाळगणारे कोणतेही चिकिस्तालय, प्रयोगशाळा किंवा केंद्र यांसह कोणतीही व्यक्ती, आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय चिकित्सालय हे अशा केंद्रात, प्रयोगशाळेत, चिकित्सालयात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी प्रवस-पूर्व लिंगनिर्धारणाच्या किंवा लिंग निवडीच्या सुविधा उपलब्ध असल्याबाबत इंटरनेटसह कोणत्याही माध्यमातून कोणतीही जाहिरात काढणार नाही व ती प्रसिद्ध, वितरित, किंवा प्रसारित करणार नाही किंवा ती काढण्याची, प्रसिद्ध करण्याची, वितरित किंवा प्रसारित करण्याची व्यवस्था करणार नाही.
२) आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांसह कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला शास्त्रशुद्ध किंवा अन्य कोणत्याही पद्धतीद्वारे प्रसव-पूर्व लिंगनिर्धारण किंवा गर्भधारणा-पूर्व लिंग निवड यासंबंधातील कोणतीही जाहिरात कोणत्याही रीतीने काढणार नाही, ती प्रसिद्ध, वितरित वा प्रसारित करणार नाही किंवा ती जाहिरात काढण्याची, प्रसिद्ध करण्याची, वितरित किंवा प्रसारित करण्याची व्यवस्था करणार नाही.
३) पोटकलम (१) किंवा पोटकलम (१) च्या तरतुदींचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या आणि दहा हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, जाहिरात यामध्ये कोणतीही नोटीस, परिपत्रक, लेबल, आवेष्टन किंवा इतर कोणताही लेख तसेच इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक वा मुद्रित स्वरुपातील इतर कोणत्याही प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात आलेल्या जाहिराती यांचा, आणि तसेच त्यामध्ये कोणतेही जाहिरात फलक, भित्तीचित्र, संकेत, दिवा, आवाज धूर किंवा वायु यांद्वारे करण्यात आलेले कोणतेही दृश्य प्रतिरुपण यांचा देखील समावेश होता.)
———
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम १८ द्वारे कलम २२ ऐवजी दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).
