बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ४ :
बालविवाहाच्या करारातील स्त्री पक्षकाराच्या निर्वाहासाठी व निवासासाठी तरतूद :
(१) कलम ३ अन्वये हुकूमनामा देतेवेळी, जिल्हा न्यायालय, विवाहाच्या करारातील स्त्री पक्षकारास तिचा पुनर्विवाह होईपर्यंत, निर्वाहखर्च प्रदान करण्यासाठी विवाहाच्या करारातील पुरूष पक्षकारास किंवा असा पुरूष पक्षकार अज्ञानी असेल तर, त्याच्या मातापित्यास किंवा पालकास निदेश देणारा अंतरिम किंवा अंतिम आदेश देखील देऊ शकेल.
(२) प्रदेय असलेल्या निर्वाहखर्चाचे प्रमाण, बालकाची गरज, तिच्या विवाहाच्या वेळी असे बालजगत असलेली जीवनशैली आणि प्रदान करणाऱ्या पक्षकाराची आर्थिक साधने विचारात घेऊन, जिल्हा न्यायालयाद्वारे ठरविण्यात येईल.
(३) निर्वाह खर्चाची रक्कम, दरमहा किंवा ठोक स्वरूपात प्रदान करण्याचे निर्धारित करता येईल.
(४) कलम ३ अन्वये अर्ज करणारा करारातील स्त्री पक्षकार असेल तर, जिल्हा न्यायालय तिचा पुनर्विवाह होईपर्यंत, तिच्या निवासासंबंधात योग्य आदेश देखील देऊ शकेल.