Site icon Ajinkya Innovations

Pca act 1988 कलम ७ : लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :

भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम १९८८
प्रकरण ३ :
अपराध आणि शास्ती :
कलम ७ :
१.( लोक सेवकाला लाच देण्या संबंधित अपराध :
कोणताही लोक सेवक जो, –
(a) क) अ) कोणत्याही व्यक्तीकडुन, स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपालन अयोग्यरित्या किंवा बेईमानीने केले जाईल किवा करवून घेतले जाईल किंवा असे कर्तव्याचे कार्यपालन पूर्ण केले जाणार नाही किंवा पूर्ण करवून घेतले जाणार नाही या आशयाने अनुचित फायदा मिळवतो किंवा स्वीकारतो किंवा मिळविण्याचा प्रयत्न करतो; किंवा
(b) ख) ब) स्वत: किंवा कोणत्याही अन्य लोकसेवका द्वारे लोक कर्तव्याचे कार्यपालन अयोग्यरित्या किंवा बेईमानीने करणे किंवा करवून घेणे किंवा अशा कर्तव्याचे कार्यपालन पूर्ण न करणे किंवा पूर्ण न करवून देणे या आशयाने की बक्षिसच्या स्वरुपात कोणताही अनुचित फायदा मिळवितो किंवा स्वीकारतो किवा मिळविण्याचा प्रयत्न करतो ; किंवा
(c) ग) क) कोणतेही लोक कर्तव्य अयोग्यरित्या किंवा बेईमानीने कार्यपालन करतो किंवा इतर अन्य लोक सेवकास कोणतेही लोक कर्तव्य अयोग्यरित्या किंवा बेईमानीने कार्यपालन करण्या हेतुने प्रेरित करतो किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणताही अनुचित लाभ स्वीकार करण्याच्या परिणामस्वरुप किंवा त्या अपेक्षेने असे कर्तव्याचे कार्यपालन करण्यास प्रतिबंधित करतो;
तो तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षापर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासास, आणि द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण १ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, कोणताही अनुचित फायदा मिळविणे, स्वीकारणे किंवा प्राप्त करण्यासाठी सहमत होणे, किंवा मिळविण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा ठरेल, मग अशावेळी लोकसेवकाद्वारे त्याचे कार्यपालन अनुचित असेल किंवा नसेल.
उदाहरण :
(एस) लोकसेवक , (पी) व्यक्तीला त्याच्या नियमित शिधापत्रिकेच्या अर्जावर वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी पाच हजार रुपए देण्यास सांगतो, या कलमान्वये अपराधासाठी (एस) दोषी आहे.
स्पष्टीकरण २ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी –
एक) जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक असेल व लोकसेवकाच्या नात्याने स्वत: साठी किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करील किंवा इतर भ्रष्ट किंवा बेकायदेशीर साधनांद्वारे अनुचित फायदा मिळविणे किंवा स्वीकारणे किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकरणांचा प्राप्त करणे किंवा स्वीकारणे किंवां प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकरणांमध्ये समावेश असेल.
दोन) लोकसेवक म्हणून अशा व्यक्तीने थेट किंवा तृतीय पक्षाद्वारे अनुचित फायदा मिळवितो किंवा स्वीकारतो किंवा मिळविण्याचा प्रयत्न करतो हे महत्वाचे असणार नाही.)
———-
१. २०१८ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ४ अन्वये कलम ७, ८, ९ आणि १० ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
यापूर्वी
कलम ७ :
लोकसेवकाने, त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक असलेले काम पार पाडण्यासंबंधात कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर परितोषण घेणे :
जी कोणतीही व्यक्ती लोकसेवक असेल किंवा लोकसेवक होण्याची जिची अपेक्षा असेल अशी व्यक्ती, केंद्र शासन किंवा कोणतेही राज्य शासन किंवा संसद किंवा कोणत्याही राज्याचे विधानमंडळ किंवा कोणतेही स्थानिक प्राधिकरण, महामंडळ किंवा कलम २ च्या खंड (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेली शासकीय कंपनी याबाबत, किंवा कोणताही लोकसेवक, मग तो नामप्राप्त असो किंवा इतर प्रकारचा असो- या बाबत, तिच्या पदाच्या नात्याने करणे आवश्यक असलेले काम करण्याबद्दल किंवा ते करण्यापासून परावृत्त होण्याबद्दल किंवा ती आपल्या पदाचे काम पार पाडत असताना कोणत्याही व्यक्तीवर कोणताही अनुग्रह करण्याबद्दल किंवा अनुग्रह करण्यापासून परावृत्त होण्याबद्दल किंवा अवकृपा दाखवण्याबद्दल किंवा अवकृपा दाखवण्यापासून परावृत्त होण्याबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही काम पार पाडण्याबद्दल किंवा पार पाडण्याचा प्रयत्न करण्याबद्दल किंवा तीस अपाय पोचवण्याबद्दल किंवा अपाय पोचवण्याचा प्रयत्न करण्याबद्दल प्रलोभन म्हणून किंवा बक्षीस म्हणून, कोणत्याही व्यक्तीकडून कायदेशीर पारिश्रमिकाशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे परितोषण, स्वत:साठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी स्वीकारील, प्राप्त करील ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसलेल्या परंतु ज्यात पाच वर्षांपर्यंत वाढ करता येईल एवढया मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरेल, तसेच द्रव्यदंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरणे :-
अ)लोकसेवक होण्याची अपेक्षा असलेली व्यक्ती :
अधिकाराच्या पदावर येणे अपेक्षित नसलेल्या व्यक्तीने जर, ती अशा अधिकाराच्या पदावर येण्याची शक्यता आहे, व त्यानंतर ती त्यांचे काम करू शकेल, असे इतरांस भासवून परितोषण मिळवले तर, ती व्यक्ती फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरू शकेल, परंतु ती या कलमामध्ये व्याख्या केलेल्या अपराधासाठी दोषी असणार नाही.
ब)परितोषण :-
परितोषण हा शब्द पैशाच्या स्वरूपातील परितोषणापुरता किंवा ज्याचे पैशात मूल्य करता येईल अशा परितोषणापुरता मर्यादित नाही.
क)कायदेशीर पारिश्रमिक :-
कायदेशीर पारिश्रमिक हे शब्द, ज्यांसाठी लोकसेवक कायद्याने मागणी करू शकतो अशा पारिश्रमिकापुरता मर्यादित नाही तर, तो ज्या ठिकाणी सेवा करीत असेल अशा शासनाने किंवा संघटनेने जे स्वीकारण्याची त्यास परवानगी दिली असेल अशा सर्व प्रकारच्या परिश्रमिकाचा त्यात समावेश असेल.
ड) काम पार पाडण्यासाठी प्रलोभन किंवा बक्षीस :-
या संज्ञेमध्ये, जे काम करण्याचा त्याचा उद्देश नाही, किंवा ते काम करण्याच्या तो स्थितीत नाही किंवा जे काम त्याने केलेले नाही अशा कामाबद्दल प्रलोभन किंवा बक्षीस स्वीकारण्याऱ्या व्यक्तीचा समावेश होतो.
ई) जेव्हा एखादा लोकसेवक, शासनाकडे त्याचे वजन असल्यामुळे त्या व्यक्तीवर त्याला हक्क प्राप्त झाला आहे यावर विश्वास ठेवण्यासाठी तिला चुकीने प्रवृत्त करत असेल, आणि त्या सेवेसाठी बक्षीस म्हणून पैशाच्या स्वरूपातील किंवा इतर कोणतेही परितोषण देण्यासाठी भाग पाडत असेल तेव्हा त्याची ही कृती या कलमानुसार अपराध ठरते.

Exit mobile version